प्रोत्साहन अनुदानसाठी शेतकरी अभय आजगावकर यांचे 26 रोजी आमरण उपोषण…

⚡बांदा ता.२४-: महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अजूनही काही पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला नाही. सदर प्रोत्साहन अनुदान देण्यात शासन टाळाटाळ करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर इन्सुली येथील शेतकरी अभय विश्वनाथ आजगावकर यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
तशा आशयाचे निवेदन त्यांनी पालकमंत्री सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, सहाय्यक निबंधक सावंतवाडी व इन्सुली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीला दिले. या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी कर्जमाफी योजना दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले. पैकी काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला. मात्र बहुतांशी शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान वितरित करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. हा शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आहे.
प्रोत्साहन योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना २५ जानेवारी पर्यंत प्रोत्साहन अनुदान रक्कम खात्यावर वितरित न केल्यास प्रजासत्ताक दिनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय अभय आजगावकर यांनी घेतला आहे.

You cannot copy content of this page