रामभक्तांनी शहरासह गावागावात काढलेल्या मिरवणूकांना उदंड प्रतिसाद…
⚡सावंतवाडी ता.२२-: अयोद्धेतील राम मंदिरात रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सावंतवाडी शहरासह तालुक्यातील गावागांवात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमामुळे संपूर्ण तालुका राममय झाला होता. गावागावात विविध मंदिरांमध्ये सकाळी प्रभू श्रीरामांचे पूजन नामसंकीर्तन, महाआरती, महाप्रसाद
भजन, कीर्तन, फुगड्या असे विविध कार्यक्रम सादर झाले. तसेच काही ठिकाणी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण असल्याने रामभक्तांनी त्याचाही लाभ घेतला.
अयोध्येतील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठनेनिमित्त सावंतवाडी तालुक्यात मंदिरांमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यानिमित्त सावंतवाडी शहरातील विठ्ठल मंदिर, नारायण मंदिर, माठेवाडा आत्मेश्वर मंदिर, इस्काॅन हरे कृष्ण मंदिर, वैश्य वाडा हनुमान मंदिर, नरेंद्र डोंगर हनुमान मंदिर येथे महाआरती त्याचबरोबर सालईवाडा हनुमान मंदिर, नरसोबा मंदिर, मुरलीधर मंदिर चिटणीस नाका हनुमान मंदिर आदी मंदिरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
मंदिरांमध्ये सकाळी अभिषेक पूजाअर्चा झाल्यानंतर दिवसभर अखंड राम नामाचा जप सुरू होता. गावागावात मोठ्या संखेने रामभक्त व नागरिक या नामजप कार्यक्रमात सहभागी झाले होते. सावंतवाडी शहरासह मळगाव, माजगाव सोनुर्ली, इन्सुली, कोलगाव, बांदा तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्येही रामभक्तांनी मोठ्या मिरवणुका काढल्या होत्या. त्याला भक्तांचा व विशेष करून महिला भगिनींचाही उदंड प्रतिसाद लाभला.
दरम्यान, काही मंदिरांमध्ये दुपारी अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे रामभक्त व नागरिकांसाठी थेट लाईव्ह दर्शन करण्यात आले. त्यानंतर महाआरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर दिवसभर व रात्रौही विविध धार्मिक कार्यक्रम सादर झाले. या सर्व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सावंतवाडी तालुका राममय व भक्तिमय झाल्याचे दिसून आले.
