Headlines

मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करा…

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांची मागणी:SIR प्रक्रियेतून मतचोरीचा संशय..

⚡सावंतवाडी ता.०८-: विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची कथित मतचोरी होत असल्याचा आरोप करत सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय घनश्याम मालवणकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करावी, अशी मागणी त्यांनी सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भारताची लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून निवडणुका स्वतंत्र व निष्पक्षपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. मात्र, निवडणूक आयोग मागील काही वर्षांपासून सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले बनल्याचे दिसत असल्याचा आरोप मालवणकर यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारात पारदर्शकता नसल्याने लोकशाही धोक्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप करत, त्यांचे सहकारी निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी त्यांच्या निर्णयांबाबत केलेल्या कथित वक्तव्यांचा संदर्भ निवेदनात देण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांत ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर अधिकृतपणे आक्षेप नोंदविण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान नवीन मतदारांची अनधिकृत नोंदणी, नावे वगळणे तसेच निवडणूक आयोगाच्या आयटी प्रणालीमध्ये केलेल्या कथित फेरफाराचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सहकाऱ्यांच्या मतांकडे दुर्लक्ष करून निर्णय घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली गेली, बिहारमध्ये मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येबाबत संशयास्पद वाढ झाल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले आहेत. या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही निवडणूक आयोगावर आरोप केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“निवडणूक यंत्रणेचा गैरवापर करून सत्ताधारी पक्षाला अनुचित लाभ मिळवून देण्यासाठी मतांमध्ये फेरफार केला जात असल्याचा संशय असून, या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी अभय मालवणकर यांनी केली आहे.त्यांनी या मागणीसंदर्भात सावंतवाडीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

यावेळी, आनंद परुळेकर रंजीत गावडे रवींद्र मापसेकर तालुकाध्यक्ष अभय मालवणकर विजय बापू ओटवणेकर, कृष्णाजी कोठावळे राजेंद्र सावंत भाऊसाहेब देसाई समीर वंजारी कौस्तुभ पेडणेकर पीटर फर्नांडिस विनायक सावंत सुधीर सखाराम सावंत शरयू सुधीर सावंत सुमेधा सावंत आनंद आयरे तुकाराम मापसेकर सगुण गावकर सुभाष नाईक महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी आफताब हेरेकर, उमेश परब ,संतोष जाईल प्रदीप चौगुले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page