कणकवली तालुका काँग्रेसची मागणी; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन..

⚡कणकवली ता.०८-: विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे मोठ्या प्रमाणावर वगळली जात असल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करून अटक करण्यात यावी, अशी मागणी कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदनr तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
निवेदनात काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग ही स्वायत्त घटनात्मक संस्था असतानाही गेल्या काही वर्षांत त्याच्या कामकाजावर सत्ताधारी पक्षाच्या प्रभावाचे आरोप होत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. SIR प्रक्रियेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असून हा प्रकार लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला.
निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांचा दाखला
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत त्यांच्या सहकारी निवडणूक आयुक्तांनी आक्षेप नोंदवल्याच्या वृत्ताचा दाखला काँग्रेसने निवेदनात दिला. अलीकडील वृत्तांनुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी SIR तसेच मतदार यादीशी संबंधित काही निर्णयांवर अनेक वेळा आक्षेप नोंदवले होते.
या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कामकाजाची पारदर्शकता आणि निर्णयप्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र, निवडणूक आयोगाने आपले निर्णय कायदेशीर प्रक्रियेनुसार आणि सामूहिकरीत्या घेतले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप
पश्चिम बंगाल आणि बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाचा उल्लेख करत काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळल्याचा आरोप केला. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४च्या काळात ४७ लाख बोगस मतदार वाढवण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
सर्व प्रकरणांची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. SIR प्रक्रियेमुळे मतदारांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होऊ नये आणि पात्र मतदारांची नावे कोणत्याही कारणाशिवाय वगळली जाऊ नयेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.दरम्यान, SIR प्रक्रियेवरून देशभरात राजकीय वाद सुरू असून विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची किंवा पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे आरोप फेटाळले असून मतदार यादीतील अपात्र, दुबार किंवा अन्य कारणांनी चुकीच्या नोंदी दूर करण्यासाठी प्रक्रिया राबवली जात असल्याचे सांगितले आहे.
लोकशाही व घटनात्मक मूल्यांचे संरक्षण करण्याची मागणी
निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कामकाजात पूर्ण पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे. मतदार यादीतील कथित अनियमितता, SIR प्रक्रियेतील निर्णय आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी विजय सावंत, प्रदीपकुमार जाधव, विनायक मेस्त्री, राजेंद्र कदम, संजय सावंत, अजय मोर्ये, आतिष जेठे, अनिल डेगवेकर, महेश तेली, संजय राणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
