कणकवली नगरपंचायत व कनकसिंधु शहर स्तर संघाचा स्तुत्य उपक्रम; १५० नागरिकांचा सहभाग..

⚡कणकवली ता.०८-: ‘स्मृती त्यांच्या, सेवा आपल्या हातून आणि समाधान एखाद्याच्या चेहऱ्यावर!’ या भावनेतून कणकवली नगरपंचायत, महिला व बालकल्याण विभाग DJAY-S आणि कनकसिंधु शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियान व पितृ पंधरवड्याचे औचित्य साधून ‘एक हात मदतीचा… आपल्या प्रियजनांच्या स्मृतींसोबत’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल १५० नागरिकांनी सहभाग नोंदविला.
आपल्या प्रियजनांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासोबतच समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने बचत गट तसेच नागरिकांना आवश्यक वस्तू व साहित्य देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, खाद्यतेल, तांदूळ, डाळी, विविध प्रकारचे धान्य, कपडे तसेच दैनंदिन वापरातील इतर आवश्यक वस्तू नागरिकांनी उपलब्ध करून दिल्या.
नागरिकांकडून जमा करण्यात आलेले हे साहित्य कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक आणि नगरसेवक संकेत नाईक यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील वृद्ध व विशेष गरजांसाठी कार्यरत असलेल्या जीवन संजीवन सेवा ट्रस्ट आनंदश्रय वृद्धाश्रम, पणदूर, दिविजा वृद्धाश्रम, असलदे तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज मतिमंद निवासी विद्यालय, करंजे, ता. कणकवली या तीन संस्थांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज मतिमंद निवासी विद्यालय, करंजेच्या मुख्याध्यापिका रश्मी सोगम, अधीक्षक भिकाजी कदम तसेच दिविजा वृद्धाश्रम, असलदेच्या साधना तेलतुंबडे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रत्येक व्यक्तीने सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपल्यास अनेक आश्रम व संस्थांना मोठा आधार मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले. आपल्या संस्थेची या उपक्रमासाठी निवड केल्याबद्दल त्यांनी नगरपंचायत व कनकसिंधु शहर स्तर संघाचे आभार मानले.
‘आपली छोटीशी मदत एखाद्यासाठी मोठा आधार ठरू शकते!’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून गरजू घटकांना मदत करण्याबरोबरच आपल्या प्रियजनांच्या स्मृतींना माणुसकीच्या सेवेतून आदरांजली देण्याची प्रेरणा नागरिकांना मिळाली.
या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, स्वच्छता निरीक्षक ध्वजा उचले तसेच कनकसिंधु शहर स्तर संघाच्या अध्यक्षा प्रिया सरुडकर, सचिव शुभांगी उबाळे, खजिनदार दिव्या साळगावकर, कार्यकारिणी सदस्य विशाखा कांबळे, स्वाती गोखले, सुचिता पालव, ज्योती रावराणे आणि निलम कोरगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
भविष्यातही नागरिकांना अशा प्रकारे सामाजिक संस्थांना मदत करायची असल्यास कणकवली नगरपंचायत किंवा कनकसिंधु शहर स्तर संघाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच या उपक्रमात सहभागी होऊन मदतीचा हात देणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानण्यात आले.
