धूम स्टाईल वाहन चालविणाऱ्या चालकांना कडक समज द्या…

उबाठा शिवसेनेच्या रियाज खान यांची पोलिसांकडे लेखी मागणी.

बांदा/प्रतिनिधी-:बांदा शहरात गेल्या आठ दिवसात महाविद्यालयीन तसेच शाळकरी मुलांकडून धूम स्टाईल गाडी चालविण्यात येत असून यामुळे झालेल्या अपघातात नागरिकांना दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे नियमबाह्य वाहन चालवीणाऱ्या विद्यार्थ्यांना कडक शब्दात समज द्यावी अशी लेखी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी बांदा पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी बांदा पोलिसांना निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, बांदा बाजारपेठेत हजारो नागरिक दिवस रात्र प्रवास करतात. शाळा भरण्यावेळी व सुटण्यावेळी शहरातील विविध शाळातील विद्यार्थी भरधाव वेगाने ट्रिपल सीट दुचाकी चालवतात. आठ दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांकडून तीन ते चार अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही विद्यार्थी आपल्या गाड्यांचा मोठा कर्णकर्कश आवाज करत वाहने हाकतात. याचा परिसरातील सर्वांनाच त्रास होतो. सदर विद्यार्थ्यांकडे वाहनाचा कोणताही परवाना नसतो. अशा शाळकरी नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांना विद्यार्थ्यांना योग्य ती समज द्यावी व कार्यवाही करावी.
बांदा पोलिसांनी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी वाहतूक पोलीस तैनात करण्याचे आश्वासन दिले. तसेच अशा धूम स्टाईल बाईकस्वारांवर कारवाई करण्याचे संकेत देखील दिलेत.
यावेळी रियाज खान, संजय आईर, राजा खान, श्रीकांत धोत्रे, सागर धोत्रे, उमेश शेटकर, अक्षर खान, राहुल माने, सूर्या चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो :-
बांदा पोलिसांना निवेदन देताना रियाज खान व इतर. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page