अन्याय दूर न केल्यास 26 जानेवारीला आंदोलन:शेतकरी कामगार संरक्षण विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांचा इशारा…
सिंधुदुर्गनगरी ता ११
सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री भागातील ९ गावे अद्यापही काजू पीक विमा नुकसान भरपाई रकमेपासून वंचित आहेत. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. या मागणीसाठी आज शेतकरी कामगार संरक्षण विकास संघटना सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून न्याय न मिळाल्यास २६ जानेवारी रोजी पासून धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील डोंगराळ भागातील ९ गावातील शेतकऱ्यांचे २०२२ मध्ये खराब हवामानामुळे काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लगतच्या गावातील शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आली. मात्र माडखोल, शिरशिंगे, कलंबिस्त, ओवळीये, वेर्ले, पारपोली, कारिवडे, निरुखे, भोम अशा ९ गावांवर अन्याय करण्यात आला आहे. पूर्वी सन २०२२ पर्यंत ही सर्व गावे आंबोली महसूल मंडळाकडे स्वयंचलित हवामान केंद्राला जोडलेली होती. सदरची गावे महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यानी सावंतवाडी महसुली मंडळाच्या स्वयंचलित हवामान केंद्राला जोडली. त्यावेळी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. तसेच मांडखोल हे नवीन केंद्र निर्माण केले. त्या ठिकाणी अजून पर्यंत स्वयंचलित हवामान केंद्र बसवलेले नाही. सावंतवाडी केंद्रात काजू फळाची नोंद होत नाही. त्यासाठी शासनाने पूर्वी ज्याप्रमाणे या सर्व गावांना भौगोलिक नैसर्गिक हवामान परिस्थितीचा विचार करून आंबोली केंद्राचे डाटा प्रमाणे सन २०२२-२३ ची विमा संरक्षित नुकसान भरपाई मिळावी. अशी आमची मागणी आहे. याबाबत लक्ष वेधूनही अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही. याबाबत शेतकरी कामगार संरक्षण विकास संघटना सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्यासहित संजय राऊळ, अशोक राऊळ ,विठ्ठल घाडी, चंद्रकांत सावंत, दिलीप राऊळ ,प्रकाश नाईक, प्रवीण सावंत, अनंत पास्ते, रूपा सावंत, प्रकाश तावडे, गोपाळ घाडी ,बुधाजी लाड, धोंडी जाधव यांनी आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. तर २६ जानेवारी पूर्वी याबाबत योग्य तो न्याय न मिळाल्यास २६ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
