स्वानंद सुंदरी सह विविध स्पर्धा:क्रिएटिव्ह सखी ग्रूप बांदाचे आयोजन..
⚡बांदा ता.०१०-: क्रिएटिव्ह सखी ग्रुप बांदातर्फे शनिवार १३ जानेवारी रोजी महिलांसाठी ‘अविष्कार तारकांचा २०२४’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘तू चाल पुढे’ मालिकेची अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, सुमित्रा वळंजू, रझिया सुलतान शेख, फौजीया खतीब, रिया आगलावे, धनश्री धारगळकर आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात विवाहित महिलांसाठी ‘स्वानंद सुंदरी” हा स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहे. खुली ग्रुप डान्स स्पर्धा, मॉम्स अँड चाईल्ड स्पर्धा हेही या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण राहणार आहे.
यंदा कार्यक्रमाचे स्वरूप सिंधुदुर्ग आणि गोवा पूरते मर्यादित न ठेवता इतर राज्यांसाठीही खुले करण्यात आले आहे. स्पर्धेत विवाहित महिला, घटस्फोटीत व विधवा महिला तसेच ३० वर्षांवरील अविवाहित महिला सहभागी होऊ शकतात. स्वानंद स्पर्धेसाठी १० हजार रुपये व क्राऊन, द्वितीय क्रमांक ७ हजार आणि तृतीय ५ हजार रुपये पारितोषिक असेल. मॉम्स अँड चाइल्ड स्पर्धेसाठी २ हजार ५०० रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक २ हजार आणि तृतीय १ हजार ५०० रुपये बक्षीस आहे.
महिलांच्या ग्रुप डान्स स्पर्धेसाठी ३ हजार व ट्रॉफी, द्वितीय २ हजार व ट्रॉफी, तृतीय १ हजार ५०० रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे. गांधी चौकातील विठ्ठल रखुमाई सभागृहात सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा अंकिता स्वार यांनी केले आहे.
