सामाजिक कार्यकर्ते मंदार नाईक, नंदू परब, प्रविण आरोसकर यांची माहिती..
⚡सावंतवाडी ता.०६-: साटेली तर्फ सातार्डे येथील सुरू असलेल्या मायनींग विरोधी लढ्याला आमचाही पूर्ण पाठिंबा असून ग्रामस्थांना मायनिंग संदर्भात होत असणाऱ्या त्रासाबाबत माजी आमदार परशुराम उपरकर यांचे लक्ष वेधून पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार, अशी माहिती आरोस येथील सामाजिक कार्यकर्ते मंदार नाईक, नंदू परब, प्रविण आरोसकर, यांनी दिली.
मागील कित्येक वर्षे बंद असलेले साटेली तर्फ सातार्डा येथील मायनिंग पुन्हा सुरू झाल्यामुळे साटेली गावातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. काही ग्रामस्थांच्या जमिनीतून अतिक्रमण करून रस्ता तयार केला असून त्या जमिन मालकांना मायनिंग संबधीत काही व्यक्तींकडून दमदाटी केली जात आहे. तर अधूनमधून मायनिंग समर्थक व ग्रामस्थ यांच्यात वाद होऊन मारामारी सारखे गुन्हे घडत आहेत. तसेच मायनिंग वाहतूक करणारे ट्रक भरधाव चालत असल्याने अपघात होऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो. साटेली गावात जर मायनिंग परत सुरू झाले तर या गावात सुद्धा माळीन सारखी स्थिती व्हायला वेळ लागणार नाही. आज साटेली येथील बहुतांश लोक हे काजू , नारळ, सुपारी उत्पन्नावर अवलंबून आहेत. या गावात मायनिंग सुरू झाल्यामुळे पाण्याची पातळी अगोदरच खाली गेली असून फेब्रुवारी महिन्यानंतर पाण्याचा तुटवडा जाणवत असतो.हे मायनीग कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे ? या ठिकाणचे स्थानिक आमदार दिपक केसरकर हे या विषयावर काहीच बोलत नाहीत. जर या मायणींग संदर्भात लवकरात लवकर निर्णय होऊन गावातील रहिवाशांना योग्य न्याय मिळाला नाही तर या मायनिंग विरोधात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार परशुराम (जिजी) उपरकर यांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली साटेली तर्फ सातार्ड गावातील रहिवाशांसाठी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल व प्रसंगी न्याय मिळवण्यासाठी हरित लवाद व न्यायालयात जाण्याचा इशारा नाईक परब व आरोसकर यांनी दिला.
