उद्घाटना दिवशी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन..
मालवण (प्रतिनिधी)
निमंत्रण स्वीकार करो… हम सबको अयोध्या चलना है… सियावर प्रभू रामचंद्र की जय… असा जयघोष करत अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिराचे उदघाटन व श्री रामाच्या बालमूर्तीची प्रतिष्ठापणा सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेचे वाटप मालवणात घरोघरी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मंदिर उदघाटनाच्या दिवशी सर्वांनी आपापल्या घरी दिवे लावून दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.
अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिराचे उदघाटन दि. २२ जानेवारी रोजी होणार असून मंदिरात श्री रामाच्या बालमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र यांच्याकडून देशभरात निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्या असून त्याचे वाटप नागरिकांकडून घरोघरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मालवणातही नागरिक घरोघरी फिरून राम मंदिर उदघाटन सोहळ्याची व मंदिराची माहिती असलेली पत्रिका वाटप करीत आहेत. या सोहळ्यास सुरक्षेच्या कारणास्तव सर्व नागरिकांना अयोध्येत जाणे शक्य नाही, त्यामुळे या सोहळ्याच्या निमित्ताने नागरिकांनी मंदिरांमध्ये एकत्र येऊन भजन, कीर्तन करावे, स्क्रीन लावून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करावे, शंखध्वनी व घंटानाद करावा, आरती करून प्रसादाचे वाटप करावे, ज्या देवतेचे मंदिर असेल त्यां देवतेचे पूजन करून श्रीराम जयराम जय जय राम या विजय महामंत्राचा १०८ वेळा जप करावा, तसेच सायंकाळी घरासमोर दिव्यांची रोषणाई करावी, दीपमाळ ब त्रिपूर लावून दीपोत्सव साजरा करावा असे या निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे.
श्री राम मंदिर उदघाटन सोहळ्या दिवशी २२ रोजी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नामस्मरण व आरती होणार आहे, यासाठी सर्वांनी मंदिरात यावे, असे आवाहन यावेळी पत्रिका वाटप करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आले.
