Headlines

कसाल रेल्वे स्टेशन होण्यासाठी पाठपुरावा करा…

संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी ता ४
कसाल येथे रेल्वे स्टेशन मंजूर करण्यात यावे. अशा मागणीचे १३५० ग्रामस्थांच्या सहीचे पत्र तसेच कसाल ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव सहित कसाल येथे रेल्वे स्टेशन मंजूर व्हावे अशी मागणी कसाल रेल्वे स्थानक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ लगत व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवतीं ठिकाण असून कोकण रेल्वे स्थापनेच्यावेळी रेल्वे प्रशासनाकडून सर्वेक्षण करून प्रसिध्द केलेल्या रेल्वे स्थानकांच्या यादीमध्ये कसाल रेल्वे स्थानक मंजुर करण्यात आले होते. मात्र कसाल रेल्वे स्थानक उभारणी संबंधित कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. सन १९९८ ते आतापर्यत कसाल रेल्वे स्थानक मंजुर होण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. पण मडगांव वरून मुंबईच्या दिशेने जाताना सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकापासून कसाल रेल्वे स्थानकासाठी प्रस्तावित केलेली जागा ही ४ कि.मी. अंतर असून ते रेल्वे सुरू होणेकरीता लागणारे इंधन रेल्वे प्रशासनाला परवडणारे नाही असे सांगण्यात आले. मात्र आता मुंबई ते सिंधुदुर्ग रेल्वे मार्गावर विद्युतिकरण झाले असून इंधनामूळे होणाऱ्या तोट्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. कसाल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून कणकवली, कुडाळ, मालवण या तीन्ही तालुक्यांना सहज प्रवास करता येतो. त्या शिवाय कसाल गावातून तारकर्ली, मालवण, आंगणेवाडी, जलमंदीर बिळवस या सारख्या अनेक पर्यटनस्थळी कसाल गावातूनच प्रमुख रस्ता जातो. कसाल रेल्वेस्थानक मंजुर झाले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नंबरची प्रवास सेवा देणारे एकमेव रेल्वे स्थानक ठरू शकते. त्या शिवाय कळसूली- दिंडवणेवाडी येथील धरणाचा बाराही महिने कसाल मध्ये येणाऱ्या नदीत पाण्याचा विसर्ग केला जातो. याचा फायदा पाणी दुष्काळच्यावेळी रेल्वे प्रशासनाला होऊ शकतो. व पर्यटण स्वयंरोजगारास चालना मिळू शकते या सर्व बाबींचा विचार करून कसाल येथे रेल्वे स्टेशन मजूर करण्यात यावे अशी मागणी कसाल रेल्वे स्थानक संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत मासिक ठराव / ग्रामसभा ठरावाची प्रत व कसाल रेल्वे स्थानक समर्थनार्थ सुमारे १३५० पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष संतोष कांदळकर, सचिव साईनाथ आंबेरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page