⚡कणकवली ता.०४-: तुटून पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना
कणकवली तालुक्यातील सांगवे – तेलंगवाडी येथे घडली आहे .सांगवे – तेलंगवाडी येथील शेतकरी विनोद रामचंद्र मोर्ये (वय ५५) यांचा शॉक लागून मृत्यू झाला.
विनोद मोर्ये हे बुधवारी संध्याकाळी साधारण ४ वा. सुमारास गुरे शोधण्यासाठी गेले होते. रात्र झाली तरी ते घरी न आल्यामुळे पत्नी व वाडीतील ग्रामस्थांनी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कुठेही आढळून आले नाहीत. ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविली असता विनोद हे सांगवे – तेलंगवाडी येथील दत्त्याचा उचवळा येथे तुटून पडलेल्या विद्युत वायरनजीक मयत स्थितीत पडलेले आढळले. घटनेची माहिती समजताच महावितरणचे अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळ गाठले होते. विनोद रामचंद्र मोर्ये यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी व मुलगा, तीन विवाहित भाऊ असा परिवार आहे.
