बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतले पुन्हा ताब्यात
सावंतवाडी ता.१६: तळवडे येथील एका पतसंस्थेत खोटे दागिने ठेवून पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या “त्या” महिलेला व सोनाराला आज पोलिस कोठडी संपल्यानंतर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यावेळी तळवडेतील आणखीन एका राष्ट्रीयकृत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पुन्हा दोघांनाही ताब्यात घेतले आहे. याकामी संशयितांच्या वतीने अँड. सुहेब डिंगणकर, अँड. सागर ठाकुर व अँड. वैभव चव्हाण यांनी काम पाहिले आहे. तळवडे येथील एका बँकेच्या शाखेला बनावट दागिने तारण म्हणून ठेवून फसवणूक करणाऱ्या कर्जदार आणि सुवर्णकराने तळवडेतील एका सहकारी पतसंस्थे मध्येही असेच खोटे दागिने तारण ठेवून बँक कर्जाची उचल केल्या प्रकरणी सहकारी पतसंस्थेच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारी नुसार त्या कर्जदार आणि सुवर्णकारा विरोधात गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले होते. त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता 16 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. हा प्रकार नोव्हेंबर 2019 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान घडला यात त्यांनी खोटे दागिने ठेवून चार लाख 42 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. याची पोलीस कोठडी आज संपल्याने त्याना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील संबंधित बँक शाखेच्या मॅनेजरनेही या आधी दोघांविरोधात तक्रार दिली असून या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस ताब्यात घेणार आहेत. हा तपास सहायक पोलिस निरीक्षक तौफिक सयद करत आहेत.
