हरी खोबरेकर:न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने सर्व कामांची स्थगिती उठवली;त्यामुळे याचे श्रेय आम्ही घेणारच…
⚡मालवण ता.०२-: कुडाळ मालवण मतदार संघाच्या कोट्यवधी रूपयांच्या विकासकामांना स्थगिती देण्याचे पाप राज्याच्या विद्यमान सरकारने केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने सर्व कामांची स्थगिती उठवून मंजूर विकासनिधी सर्व कामांना परत केला. त्यामुळे याचे श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचेच आहे आणि ते आम्ही घेणारच. यामुळे भाजपाला पोटशूळ उठत असेल तर त्यांनी अगोदर मतदार संघाच्या विकासासाठी भरघोस निधी आणून दाखवावा. आमदार, खासदारांनी सूचविलेली कामे आपण केल्याचे भासवून जनतेला फसविण्याचे प्रकार बंद करावेत अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. गेल्या वर्षभरात सुमारे १०० कोटी हून अधिक रूपयांचा निधी कुडाळ-मालवण मतदार संघात आणण्याची ताकद फक्त आमदार वैभव नाईक यांच्यातच आहे असेही श्री. खोबरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
मालवण उबाठI शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवा शहरप्रमुख मंदार ओरसकर, मंदार केणी, उमेश मांजरेकर, दिपा शिंदे, आकांक्षा शिरपुटे, पुनम चव्हाण, दत्ता पोईपकर, प्रसाद आडवणकर, यशवंत गावकर, निनाक्षी शिंदे, रश्मी परूळेकर, माधुरी प्रभू, सुर्वी लोणे, राजू मेस्त्री तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. खोबरेकर म्हणाले, जिल्हा नियोजनचे सदस्य आमदार, खासदार आणि इतर सदस्य असतात. या सदस्यांनी सुचविलेल्या कामांना निधी देण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची असते. यामुळे नियोजनकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून होणाऱ्या कामांचे नारळ फोडण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींना आहे. निलेश राणे हे
माजी खासदार आहेत. ते नियोजनचे सदस्य आहेत का? त्यामुळे त्यांनी सुचविलेल्या कामांना निधी उपलब्ध होण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही पालकमंत्र्यांचे आभार मानत आहोत कारण त्यांनी मालवणच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हेही नियोजनमधून कामे सुचवू शकतात, त्या कामांचे श्रेय आम्ही कधीच घेणार नाही? असाही टोला श्री. खोबरेकर यांनी लगावला. आमच्या कामांकडे लक्ष देण्यापेक्षा आधी निधी आणा आणि नविन कामे सूचवून विकासकामे पूर्ण करा, तरच जनता तुमच्या बाजुने राहिल. आमच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न झाल्यास जनता सर्व जाणते. यामुळे योग्यवेळी
योग्य उत्तर मिळेल असे ते म्हणाले,
आमचा सी वर्ल्डला कधी विरोध नव्हता आणि राहणारही नाही. मात्र ३५० एकरमध्ये होणाऱ्या प्रकल्पासाठी १३९५ एकर भूखंड घेतला जात असल्यानेच आम्ही भुमीपुत्रांच्या बाजूने उभे राहिलो. वायंगणी गाव हे बारमाही शेतीसाठी प्रसिद्ध असताना संपूर्ण गावच विस्थापित करण्याचा डाव आखण्यात येत होता. १००० एकर जागा कोणाच्या घशात घातली जाणार होती? हेही जाहीर करणे गरजेचे आहे. कोकणच्या सौंदर्यात भर पडणार आणि पर्यटकांना आकर्षित करणारा प्रकल्प येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करू. मात्र स्थानिकांना विस्थापीत करून जमिनी बळकविण्याचा प्रयत्न झाल्यास आमचा त्याला विरोध राहिल. तरूणांना रोजगार देण्यासाठी सी-वर्ल्ड प्रकल्प झाल्यास आम्ही साथ करू मात्र फक्त जमिनी घेण्यासाठी प्रकल्प होत असेल तर आम्ही जनतेसोबत राहू असेही श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज हे शिवसेनेमुळेच झाले आहे. आमदार व खासदार यांच्या प्रयत्नातून शासकीय कॉलेजआहे. आमदार व खासदार यांच्या प्रयत्नातून शासकीय कॉलेज होत आहे, याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. राणे यांनी आपले खासगी मेडिकल कॉलेज केले, आम्ही जनतेसाठी मेडिकल कॉलेज केले. अनेक बंधारे बांधून मच्छीमारांच्या घरांना संरक्षण दिले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला. पर्ससीन मच्छीमारीला विरोध करून पारंपरिक मच्छीमारांच्या पाठिशी ठाम राहिलो. आम्ही सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आणि न्याय मागण्यांसाठी सतत लढत आहोत, असेही श्री. खोबरेकर यांनी सांगितले.
