ऐतिहासिक पायरी व प्राचीन जलनिचरा व्यवस्था उजेडात..
⚡मालवण ता.३०-:
दुर्गवीर प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने ऐतिहासिक रामगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील देवडीजवळ अनेक वर्षांपासून साचलेला मातीचा थर काळजीपूर्वक हटविण्यात आला. या कामामुळे अनेक वर्षे पूर्णपणे मातीत गाडली गेलेली एक ऐतिहासिक दगडी पायरी पुन्हा प्रकाशात आली. हा क्षण उपस्थित दुर्गवीरांसाठी अत्यंत समाधानाचा आणि अभिमानाचा ठरला.
याचबरोबर, गडावरील कालांतराने विस्कळीत झालेल्या दगडी पायऱ्यांची पुनर्बांधणी करून त्या पूर्ववत करण्यात आल्या. प्रत्येक दगड योग्य ठिकाणी बसवत दुर्गवीरांनी गडाच्या ऐतिहासिक वैभवाला पुन्हा नवसंजीवनी देण्याचे कार्य केले.
हे काम सुरू करण्यापूर्वी माती काढल्यानंतर तयार होणाऱ्या जागेत पावसाचे पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, कामादरम्यान इतिहासकालीन जलनिचरा व्यवस्था (ड्रेनेज) उघडकीस आली. शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही जलनियोजन व्यवस्था आजही कार्यक्षम असल्याचे दिसून आले. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होणार असल्याची खात्री मिळाल्याने संवर्धनाचे काम अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आले. तत्कालीन स्थापत्यकारांच्या दूरदृष्टीचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याची भावना दुर्गवीरांनी व्यक्त केली.
दुर्गवीर प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून रामगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सातत्याने श्रमदान करत असून, गडाचे मूळ स्वरूप जपण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या मोहिमेत अनेक वर्षांपासून मनात जपलेले एक महत्त्वाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहण्याचा आनंद प्रत्येक दुर्गवीराच्या चेहऱ्यावर झळकत होता. श्रमाचे प्रत्येक थेंब इतिहास संवर्धनाच्या समाधानात परिवर्तित झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या श्रमदान मोहिमेत मधुकर विचारे, लक्ष्मण घाडीगावकर, तुषार चव्हाण, मिलिंद चव्हाण, सुबोध चव्हाण, ओंकार पालव, प्रथमेश राणे, प्रणय चव्हाण, हार्दिक परब आदी दुर्गवीरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भविष्यातही रामगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी अशाच प्रकारे सातत्याने श्रमदान सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
