आंबोली,ता.२८: येथील आरोग्य केंद्रात औषधे गोळ्या इंजेक्शन चा तुटवडा असून जिल्ह्यातच पुरवठा उपलब्ध नसल्याने आरोग्य व्यवस्थेची हेळसांड झाली आहे. गतिमान सरकार म्हणून सध्या अतिशय वाईट अवस्था ही आरोग्य केंद्रांची असल्याने सामान्य रुग्णांची परवड या सरकार मुळे होत आहे. शिंदे-भाजप सरकार हे बोलघेवडे सरकार असल्याची टीका शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट)केली आहे.
सध्या सरकार चा खेळ झाल्यामुळे सगळीकडे सावळागोंधळ आहे.एकही विभागात धड कामे होत नाही.घोषणा फक्त होतात प्रत्यक्ष काहीही नाही. आरोग्य व्यवस्थेचे देखील तीन तेरा वाजले आहेत. आंबोली आरोग्य केंद्रात औषध गोळ्या इंजेक्शनचा तुटवडा आहे.काल जिल्ह्यावरून फक्त 50 इंजेक्शन देण्यात आले.गोळ्या देखील फक्त ठराविक दिल्या.जिल्ह्यातच पुरवठा नाही. रुग्ण सेवा समितीकडे सध्या केसपेपर चे पैसे घेत नसल्याने निधी गोळा होत नाही.त्यामुळे स्थानिक पातळीवर रुग्ण कल्याण समिती देखील खरेदी करू शकत नाही. त्यामुळे सध्या शिंदे भाजप चे जिल्ह्यात मंत्री असून देखील ही अवस्था आहे.सर्वच ठिकाणी अशी बेबंदशाहि असल्याने ग्रामस्थांचे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे शासन व्यवस्था काय करते असा सवाल उपस्थित होत आहे.विकासाच्या फुगीर आकडेवारीत प्रत्यक्षात काय? एकीकडे महागाई,निस्तेज हतबल व्यवस्था आणि कशाचाही ताळमेळ सध्या सरकार मध्ये नसल्याने आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.येथील रिक्त पदांचा प्रश्न गेली अनेक वर्षे तसाच आहे. इथल्या नागरिकांच्याआरोग्य प्रश्नाकडे लक्ष देणार कोण? इथे कोण वाली शिल्लक आहे की नाही.इथे फक्त हवेतली आश्वासने ऐकायला येतात. निवडणूक आली की जमिनी नावावर करण्याच्या गर्जना होतात.कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या घोषणा जिल्ह्यात रोज होतात मात्र इथे औषधे गोळ्या नाहीत.रस्त्याची बिकट अवस्था,शासकीय अनुदान योजनांची कामे नाहीत केवळ कागदावर दाखवली जातात त्यामुळे गतिमान सरकार की मंद सरकार अशी उपरोधिक टीका आंबोली ठाकरे गट शिवसेना कार्यकर्ते शिवसेना विभागप्रमुख बबन गावडे, संतोष पाताडे,अनिल चव्हाण,काशीराम राऊत,उत्तम पारधी,सत्यवान गावडे,शशी सावंत,बाळा कोरगावकर,संजय परब,दादा नाटलेकर आदींनी केली आहे.
