⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: मळगाव- आजगावकरवाडी येथील भागवत भटजी यांच्या निवासस्थानी असलेल्या श्री देव दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
दत्त जयंतीनिमित्त येथील मार्गांवर विविध प्रकारची रांगोळी रेखाटण्यात आली होती. या सोहळ्यानिमित्त मंगळवार सकाळपासून अखंड नामस्मरणास सुरुवात झाली. यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्र घोषाने परिसर दत्तमय झाला. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता तेंडोली येथील मुंडले बुवा यांचे सुश्राव्य कीर्तन, सायंकाळी ७ वाजता दत्तजन्म सोहळा व पालखी प्रदक्षिणा पार पडली. रात्री इन्सुली येथील श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळाचा ‘शिवभरताग्रज संग्राम’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगाला नाट्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आज सकाळी नित्य पूजा तर दुपारी दत्ताची महाआरती पार पडली. त्यानंतर उपस्थित सर्वांना तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मळगाव पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थिती दर्शवत केळी, नारळ ठेऊन श्री देव दत्ताचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.
मळगाव-आजगावकरवाडी येथील दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा….
