⚡मालवण ता.२६-: दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव शनिवार दि 2 मार्च 2024 रोजी होणार आहे
मालवण तालुक्यातील आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा यात्रोत्सवाची तारीख निश्चीतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. गावातील मुंबईस्थित चाकरमानी तर यात्रेच्या तारखेकडे डोळे लावून असतात. या यात्रोत्सवाची तारीख ही देव दिवाळी नंतर जाहीर होत असल्याने मुंबईस्थित चाकरमानी, मित्रमंडळी आपआपल्या नातेवाईकांना सतत संपर्क ठेवून असतात. तारीख निश्चित झाली कि यात्रेत येण्यासाठी तिकीट बुकिंग साठी गर्दी, सुट्टी करिता धडपड करत असतात.
काही दिवसांपूर्वी पारध करण्यात आली होती. त्यानंतर धार्मिक विधी केल्यानंतर आज सकाळी मंडळाच्या वतीने आंगणेवाडी यात्रा शनिवारी 2 मार्चला होणार असल्याचे जाहिर करण्यात आले. दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठणाऱ्या या यात्रोत्सवात यावर्षीही १० ते १५ लाखाहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज बांधण्यात येत आहे. आंगणेवाडी मंडळ तसेच जिल्हाप्रशासन तालुका प्रशासनाकडून यात्रा नियोजनास लवकरच सुरवात होणार आहे.
