शामराव काळे:बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाची सांगता..
⚡बांदा ता.२५-: विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय ठेऊन वाटचाल करणे हे गरजेचे आहे. खेळात आणि त्यात मिळविलेल्या कौशल्याचा पुढील जीवनात कसा फायदा होतो याचा विचार विद्यार्थीदाशेतच मुलांनी केल्यास ते जग काबीज करू शकतात असे गौरवोदगार बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी येथे केले.
बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाची सांगता पारितोषिक वितरण समारंभने येथील खेमराज हायस्कुलच्या मैदानावर झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री काळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, अध्यक्षा कल्पना तोरसकर, शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अजय शिंदे, कोषाध्यक्ष वैभव नाईक, समन्व्य समिती सचिव सौ. रश्मी तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, बांदा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समीर भोसले, मुख्याध्यापिका माधवी सावंत, सुनीता नाईक, संस्था संचलित सर्व भगिनी शाळांचे मुख्याध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.
आंतरशालेय क्रीडा महोत्सवात क्रीडा व वक्तृत्व स्पर्धामध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले. यावर्षी भेडशी हायस्कुलने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. तर बांदा खेमराज हायस्कुलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
डॉ. मिलिंद तोरसकर यांनी सातत्याने गेली ३५ वर्षे आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव राबविणाऱ्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले. यश मिळविलेल्या सर्व मुलांना देखील त्यांनी भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सावंत, रणवीर रणसिंग, सूर्यकांत सांगेलकर यांनी केले. आभार क्रीडा शिक्षक नंदकिशोर नाईक यांनी मानले.
