उपसरपंच बाळू गावडे : वीज वाहिन्या तुटल्याने दोन दिवस पाणीपुरवठा बंद..
⚡बांदा ता.२५-: मडुरा चवडीवाडी येथे पाटबंधारे विभागाचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. काम करताना हलगर्जीपणा झाल्यामुळे वीज वाहिन्या तुटल्या अन दोन दिवसांपासून गावात पाणीपुरवठा बंद आहे. तसेच विजेचा लपंडावही सुरू आहे. जोपर्यंत वीज वितरण व पाटबंधारे विभाग याकडे गांभीर्याने पाहून तात्काळ प्रश्न मार्गी लावत नाहीत तोपर्यंत काम थांबवा असे मडुरा उपसरपंच बाळू गावडे तसेच उपस्थित ग्रामस्थांनी सांगत काम रोखले.
शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे पाईपलाइन टाकण्याचे काम चवडीवाडी येथे गेले अनेक दिवस सुरू आहे. काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याची अद्याप भरपाई देखील मिळाली नाही तरी देखील शेतकरी गप्प आहेत. परंतु तेथे काम करत असलेले कर्मचारी गावातील लोकप्रतिनिधींना आज उलट उत्तर देत असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे काय होणार असे सांगत उपसरपंच बाळू गावडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रकल्प अधिकारी अतुल पाटील यांनीही ताबडतोब घटनास्थळी भेट घेत पाहणी केली व जी समस्या आहे ती तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
वीज वितरणला मडुरा ग्रामस्थ वारंवार सहकार्य करतात. परंतु सद्यस्थितीत निर्माण झालेली समस्या सोडविण्यासाठी विभाग प्रयत्नशील दिसत नाही. काही वीज कर्मचारी अरेरावीची भाषा करतात त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजावावे अन्यथा आम्ही लोकशाहीचा मार्ग पत्करू असा इशारा बाळू गावडे यांनी दिला.
सरपंच उदय चिंदरकर म्हणाले की, अनेक वेळा स्वतःच्या खिशातून पैसे घालून वीज समस्या मार्गी लावली याचे उपकार म्हणून वीज कर्मचारी असे वागतात. कर्मचाऱ्यांच्या अशा उन्मत्तपणाची दखल अधिकाऱ्यांनी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
