⚡मालवण ता.२४-: श्री दत्त नामाचा जयघोष करत आणि श्री संत दादा महाराज यांचे स्मरण करत… वाजत गाजत आणि फटाक्यांच्या आताषबाजीत, चैतन्यपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आज वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या जीर्णोद्धार केलेल्या श्री दत्त मंदिराचा कलशारोहण समारंभ संपन्न झाला. उद्योजक डॉ. दिपक परब आणि सौ राधिका परब यांच्या हस्ते कलशाचे पूजन झाल्यानंतर श्री संत दादा महाराज यांचे नातू रामदास प्रभू यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले. श्री संत दादा महाराज यांच्या उपासक आणि बहुसंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत हा समारंभ उत्साहात संपन्न झाला.
वायंगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या श्री दत्त मंदिराच्या कलशारोहण समारंभानिमित्त आज सकाळी ८ वाजल्यापासून मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. सकाळी श्री दत्त आणि श्री संत दादा महाराज समाधीचे नित्यपूजन झाल्यावर होमहवन, धार्मिक विधी व कलश पूजन झाले. दादा महाराज यांचे भक्त व उद्योजक डॉ. दिपक परब आणि सौ राधिका परब यांनी धार्मिक विधी व पूजा अर्चा करतानाच मंदिरावर आरोहण करण्यात येणाऱ्या कलशाचे पूजन केले. होमहवन विधी नंतर कलशाची मंदिराभोवती वाजत गाजत प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिरावर रामदास प्रभू यांच्या हस्ते कलशाचे आरोहण करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
यानंतर दुपारी आयोजित महाप्रसादाचा उपस्थित भक्तगणांनी लाभ घेतला. त्यानंतर श्री संत दादा महाराज दिनदर्शिका तसेच श्री संत दादा महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारीत भक्ती लिलामृत भाग १,२,३ कादंबरी कल्याण कटोरा व आरती संग्रह या पुस्तकांचे सीताराम उर्फ नाना करमळकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांचे वाटप उपस्थित भक्तगणांना करण्यात आले. यावेळी मनिष साळगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. दिपक परब, रामदास प्रभू, नाना करमळकर,श्रीमती द्रौपदी परब, श्रीमती प्रमिला परब , हनुमंत प्रभू, सुरेश ठाकूर, प्रमुख गावकरी श्री. सावंत, सरपंच सौ. संजना रेडकर, चंद्रकांत हडकर, शांताराम टिकम, रुपेश अवसरे, समीर प्रभूचांदेरकर, श्री. रेवंडकरमनीष राऊळगावकर , यांच्यासह बहुसंख्य भक्तगण उपस्थित होते.
या सोहळ्यानिमित्त सायंकाळी ७ वाजता भजन स्पर्धा संपन्न झाली. सोमवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री गुरुदेव दत्ताची आणि श्री संत दादा महाराज यांच्या समाधीची नित्यपूजन, १० वाजता दत्तयाग, भजन, आरती, धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता स्थानिक भजने सादर होणार आहेत. मंगळवार दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता नित्यपूजा धार्मिक कार्यक्रम, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता भिक्षाफेरी, १० वाजता गादीवर भिक्षा घेणे, १०:३० वाजता कीर्तन, १२ वाजता दत्त जन्म, रात्री १ वाजता पालखी काढण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाना उपस्थित रहावे, असे आवाहन घाडीवाडी मित्रमंडळ वायंगणी व ओमसाई भजन मंडळ वायंगणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
