भविष्य घडवण्यासाठी आवश्यक गुणांची पेरणी योग्य वेळी होणे महत्त्वाचे…

फादर कॅजिटन रोड्रिक्स:दिव्य ज्योती प्रशालेत नाताळ उत्सव आनंदात साजरा…

⚡बांदा ता.२३-: ‘तुम्ही मुले कोणत्या रंगाची, कोणत्या जाती धर्माची आहात हे महत्त्वाचे नाही, तर तुमच्यात योग्य रीतीने तुमचे व पर्यायाने देशाचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी आवश्यक गुणांची पेरणी योग्य वेळी होणे महत्त्वाचे आहे आणि हे काम तुमचे शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत. तुम्हीही त्यांना योग्य प्रकारे साथ द्या. नेहमी इतरांना मदतीचा हात पुढे करा. आई-वडील ,शिक्षक यांच्या प्रति आज्ञाधारक रहा. तुमचे भविष्यातील ध्येय ठरवा आणि ते मिळवण्यासाठी अथक प्रामाणिक प्रयत्न करा, मोबाईलचा वापर टाळा. एकमेकांशी संवाद साधा. एकमेकांना समजून घ्या. गरजेच्या वेळी एकमेकांना मदतीचे हात पुढे करा, असा संदेश सावंतवाडी येथील नवसरणीचे प्रमुख फादर कॅजिटन रोड्रिक्स यांनी यावेळी दिला. दिव्य ज्योती प्रशालेत आयोजित नाताळ आनंद उत्सव सोहळ्यात ते बोलत होते.

दिव्य ज्योती प्रशालेत नाताळ उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नवसरणी सिंधुदुर्ग प्रांताचे प्रमुख फादर कॅजिटन रॉड्रिक्स, प्रशालेचे मुख्याध्यापक फादर बॅनेट, उपमुख्याध्यापक फादर रॉबिन आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, मुकाभिनय, नाट्य ,गाणी असे अनेकविध कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रशालेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धात जास्तीत जास्त बक्षिसे मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आराध्य सावंत, अस्मी आईर, मेघराज गवस, सृष्टी परब, सारांश शिरसाट, ग्लॅन्सी वकडेपोनीथिल,

गआर्यन फत्ते सिंग ,स्वरा सातार्डेकर, उद्धव परब ,क्लिंटन फर्नांडिस, वेदिका माने हे विद्यार्थी सन 2023- 24 च्या शैक्षणिक वर्षातील अष्टपैलू विद्यार्थी घोषित करण्यात आले. वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या निकषावर ब्ल्यू हाऊस प्रथम ,ग्रीन हाऊस द्वितीय तर यलो हाऊस तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले .प्रशालेचे उपमुख्याध्यापक फादर रॉबिन यांनी मुलांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. एकमेकांसोबत नेहमी आपली सुख दुःखे वाटा आणि आनंदात रहा, आपल्या सहवासाने इतरांना आनंद द्या ,असा संदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
मान्यवरांच्या हस्ते केक कापून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. सांताक्लॉज ने मुलांना चॉकलेट, भेटवस्तू देऊन मुलांचा आनंद द्विगुणीत केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी प्राप्ती प्रभू व वैष्णवी पाटील यांनी केले तर इयत्ता नववीची विद्यार्थिनी गायत्री गावडे हिने आभार मानले.
फोटो :-
बांदा दिव्य ज्योती प्रशालेत नाताळ साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page