मत्स्य व्यवसाय अधिकारी यांची मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्याकडे मागणी..
मालवण दि प्रतिनिधी
तळाशीलच्या समुद्रात बेकायदेशीर मच्छिमारी करण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या गंगाराम कृष्णा पाटील यांच्या हेरंब १ या नौकेवर काल मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केल्यानंतर आज मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. स. अलगिरी यांच्याकडे प्रतिवेदन सादर करीत नौकेच्या मालकावर सागरी अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करीत संबंधितांवर जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
सोमवारी सायंकाळी मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी सागरी गस्त घालत असताना तळाशील तोंडवळीच्या समुद्रात गंगाराम कृष्णा पाटील यांची हेरंब १ ही नौका आढळून आली. या नौकेवर पर्ससीनचे जाळे होते मात्र त्यांच्याकडे गिलनेट मच्छिमारीचा परवाना होता. मत्स्य व्यवसाय विभागाने नौकेला थांबण्याचा इशारा देऊनही त्या नौकेने पळ काढल्याने त्या नौकेचा मत्स्य व्यवसायच्या शितल या गस्ती नौकेने पाठलाग करीत नौका पकडली होती.
या पकडलेल्या नौकेवर आज कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आज मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. स. अलगिरी यांच्याकडे प्रतिवेदन सादर करीत नौकेच्या मालकावर सागरी अधिनियम १९८१ चे कलम ४ नुसार काढलेल्या अधिसूचना आदेश दि. २३/०८/२०२२ च्या तरतुदींचा भंग करणे , म.सा. म. नि. अ. १९८१ चे नियम ५ (२) चा भंग करणे तसेच नौकेवर कार्यरत असलेला खलाशाचा सागरी जोखमीचा विमा न उतरविणे खलाशांची ओळखपत्रे नसणे , म. सा. म. नि. अ. १९८१ चे कलम ७ चा भंग (विना परवाना मासेमारी), म. सा. म. नि. अ. १९८२ चे कलम ८ (४) चा भंग (नौकेवर नोंदणी क्रमांक नाही) अशाप्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधितांवर जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केल्याची माहिती मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी दिली
