वेळेत कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला दंड ठोठावा

बांधकाम सभेत म्हापसेकर यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी ता १५ जिल्ह्यातील विकास कामे वेळेत पूर्ण व्हावीत . यासाठी प्रत्येक कामाला सरसकट मुदतवाढ देऊ नका. सक्षम कारण असेल तर एकदाच मुदतवाढ द्या. तरीही काम पूर्ण होत नसेल तर संबंधित ठेकेदाराकडून प्रतिदिन पाचशे रुपयांपर्यंत दंड वसूल करा. असे आदेश प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी बांधकाम समिती सभेत दिले. जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बांधकाम सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, सदस्य प्रदीप नारकर, राजेश कविटकर, संजय आग्रे, श्रीया सावंत, आदी उपस्थित होते .मात्र आजच्या बैठकीत सर्वच विभागाच्या खातेप्रमुखाची अनूपस्थिती जानवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध विकास कामे, इमारत बांधकामे, पाच वर्षापूर्वी मंजूर असूनही अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. याबाबत सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तर संबंधित कामे पूर्ण कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला असता कामे अपूर्ण आहेत अशा ठेकेदारांना नोटिसा काढून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात येत असल्याचे बांधकाम कार्यकारी अभियंता यांनी सांगितले. मात्र वसूल करण्यात येणारा दंड हा प्रति दिन ५० ते १०० रुपये असल्याचे यावेळी स्पष्ट केले. संबंधित ठेकेदार दंड भरुन कामे रेंगाळत ठेवत असल्याची बाब यावरून समोर आली असून सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी जिल्हा परिषद ची कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजे तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. एखादा कायदा केला तर त्याची भीती वाटली पाहिजे. तसेच दंड केला तर तो भरताना घाम फुटला पाहिजे. त्यासाठी संबंधित ठेकेदार हा कोणाचा कार्यकर्ता आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे हे न बघता त्याच्याकडून प्रति दिन ५०० रुपये पर्यंत दंड वसूल करा. असे आदेश राजेंद्र म्हापसेकर यांनी यावेळी दिले. तसेच प्रत्येक कामाला सरसकट मुदतवाढ न देता सक्षम कारण असेल तर एकदाच मुदतवाढ द्या. आणि त्या मुदतीत काम पूर्ण झाले नसेल तर त्याच्याकडून दंड वसूल करा. अशी सूचनाही यावेळी केली. जिल्ह्यातील नगरपंचायतीचे बजेट पाहता जिल्हा परिषदेच्या बजेट पेक्षा मोठे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बजेट वाढविन्यासाठी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने उपाययोजना करा. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागी व्यावसायिक गाळे बांधून ते भाड्याने द्यावेत. तसेच जिल्हा परिषदच्या मालकीची रेस्ट हाऊस आहेत त्यांची डागडुजी करून आणि अधिकच्या सुविधा निर्माण करून पर्यटनदृष्ट्या त्याचा वापर करा. अशा सूचना सदस्यांनी सभेत केल्या. ग्रामपंचायतीने ठेका घेतलेली कामे रखडतात जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना विकास कामांचा ठेका दिला जातो. मात्र काही ग्रामपंचायती वगळता अनेक ग्रामपंचायतीनी ठेका घेतलेली कामे रखडली आहेत. ती वेळेत पूर्ण होत नाहीत असा अनुभव आहे . तरी ज्या ग्रामपंचायतींनानी कामाचा ठेका घेतला आहे आणि ती कामे रखडली आहेत अशा ग्रामपंचायतींना नोटिसा द्या आणि कामे वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने सूचना करा .अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा .अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केली.

You cannot copy content of this page