केवळ उपोषण न करता ठोस निर्णय घ्या

नीलेश राणे:मालवणमधील मश्चिमार आंदोलनाला भेट देत दर्शविला जाहिर पाठिबा

मालवण (प्रतिनिधी) परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर आणि बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सिंधुदुर्गच्या वतीने पारंपरिक मच्छीमारांनी छेडलेल्या साखळी उपोषणाच्या आजच्या चौथ्या दिवशी भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी उपोषणकर्त्या मच्छीमारांची भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला. पारंपारिक मच्छीमारांचा प्रश्न सुटला पाहिजे? तुम्ही किती दिवस उपोषण करणार ? आता ठोस निर्णय घ्या, तुमच्या कोणत्याही आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा असेल, पारंपारिक मच्छीमारांचा निर्णय तोच माझा निर्णय असे निलेश राणे यांनी सांगत पारंपारिक मच्छीमारांच्या कायदेशीर लढ्यात आपण सोबत असल्याचे सांगितले. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी आज मालवणात दाखल होत या उपोषणकर्त्या मच्छीमारांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, बाबा परब, आनंद शिरवलकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, प्रितेश राऊळ, बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, विक्रांत नाईक, भाई मांजरेकर, अभय कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर व संजय केळुसकर यांनी पारंपारिक मच्छीमारांचे प्रश्न निलेश राणे यांच्यासमोर मांडले. यावेळी निलेश राणे म्हणाले, मच्छीमार आंदोलन करत आहेत याचा अधिकाऱ्यांना कोणताही फरक पडत नाही. बंदी कालावधीत केंद्राच्या सागरी हद्दीत पर्ससीन मासेमारी करण्यास केंद्राकडून परवानगी आहे असा कोणता निर्णय झालेला नाही असा दावा यावेळी निलेश राणे यांनी करत अधिकारीही तसे लेखी देण्यास तयार नाहीत म्हणजेच अधिकाऱ्यांकडेही असा कोणता निर्णय हाती आलेला नाही. अधिकारी मच्छीमारांना मूर्ख बनविण्याचे काम करत आहेत. मच्छीमारांना आश्वासने देणाऱ्या सत्ताधाऱ्यांची या प्रश्नी निर्णय घेण्याची औकात नाही. अधिकारी या प्रश्नी मच्छीमारांसमोर ठोस भूमिका मांडत नसतील तर अधिकाऱ्यांना जी भाषा समजते त्या भाषेत त्यांना मी सांगेन असा इशारा यावेळी निलेश राणे यांनी दिला. पारंपारिक मच्छीमारांच्या या मागण्यांबाबत आपण खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा करून केंद्रीय व राज्य स्तरावरील मंत्र्यांशी चर्चा करण्यास विनंती करणार आहोत. तसेच आपण सर्वतोपरी पाठपुरावा करून मच्छीमारांच्या कायदेशीर लढाईत साथ देणार असे आश्वासन यावेळी निलेश राणे यांनी मच्छीमारांना दिले.

You cannot copy content of this page