पारंपारिक मच्छीमारांचा इशारा
*💫मालवण दि.१५-:* बंदी असूनही सुरू असलेल्या एलईडी पर्ससीन मासेमारीवर तसेच परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर मत्स्य विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सिंधुदुर्गच्या वतीने पारंपरिक मच्छीमारांनी छेडलेले साखळी उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच होते. शासनाने पारंपारिक मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास बुधवारपासून आंदोलन तीव्र करू असा इशारा यावेळी मच्छीमारांच्यावतीने मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी दिला. एलईडी लाईट पर्ससीन मासेमारीवर आणि हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई करण्याचा मागणीसाठी पारंपारिक मच्छीमारांनी पारंपारिक मच्छीमारांनी मालवणात गेले चार दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. चौथ्या दिवशीही मत्स्य अधिकाऱ्यांनी कारवाई बाबत भूमिका स्पष्ट न केल्याने हे उपोषण सुरूच होते. याबाबत पत्रकारांशी बोलताना मिथुन मालंडकर यांनी शासनाला आज सायंकाळ पर्यंतची मुदत दिली. मच्छीमारांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास बुधवार पासून आंदोलन तीव्र करणार आहोत. संपूर्ण मासेमारी तसेच मासेविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्याच्या किनारपट्टीवरील पारंपारिक मच्छीमारांनाही सामावून घेऊन महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवणार आहोत असा इशारा यावेळी मिथुन मालंडकर यांनी दिला.
