युवापिढीने व्यक्तिमत्व विकासातून सामाजिक विकास करावा…

सरपंच वेदिका दळवी:शिबिराचे थाटात उद्घाटन..

⚡कुडाळ ता.१९-: युवापिढीने व्यक्तिमत्व विकासातून सामाजिक विकास करावा, असे प्रतिपादन वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी यांनी केले. पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूर तिठा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या.

पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूर तिठा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग म्हणजेच एनएसएसचे संस्कार शिबिर वेताळ बांबर्डे येथे सोमवार, १८ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन सरपंच वेदिका दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रा.
दीपेश गावडे यांनी करताना कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यावेळी महाविद्यालयातर्फे सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे तसेच ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांनी स्वागत केले.
या श्रमशिबिराच्या मुख्य उद्घाटक वेताळ बांबर्डे सरपंच यांनी युवा वर्गाला संबोधित करताना म्हटले की, युवापिढीने व्यक्तिमत्व विकासातून सामाजिक विकास करणे महत्त्वाचे आहे. आमच्या गावात हे श्रमसंस्कार शिबिर होतेय, ही महत्वाची बाब होय. येत्या ७ दिवसात व्यक्तिमत्व विकासाबरोबरच पर्यावरण, स्वच्छता, सजक नागरिक, आरोग्य आदी विषयांवरील तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे मार्गदर्शन सर्व स्वयंसेवकांनी आत्मसात करावे, असे प्रतिपादन केले.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी पणदूर तिठाचे सचिव डॉ. अरुण गोडकर यांनीही एनएसएसच्या स्वयंसेवकांना शिबिराचे महत्त्व पटवून दिले. आज विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण असले पाहिजेत. आतूनच स्वतःचा आणि समाजाचाही विकास साधता येतो असे प्रतिपादन यावेळी डॉ. अरुण गोडकर यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांनी एनएसएस स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना म्हटले की, युवा पिढीचा विकास करून समाजाचाही विकास साधता येतो. तसेच स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाता येते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा पद्धतीचे निवासी संस्कार शिबिर आवश्यक असते. आज वेताळ बांबर्डे या गावाने आमच्या महाविद्यालयाला पुढील सात दिवसांसाठी येथे श्रमसंस्कार शिबिर करण्यास परवानगी दिली याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत.
यावेळी वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गावडे, साजूराम नाईक, दशरथ कदम यांनी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराला शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य सृष्टी सावंत, रश्मी तिवरेकर, शैलेश घाटकर, समृद्धी कदम आदी उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे प्रा. प्रथमेश गोसावी, प्रा. स्मिता परब, प्रा. अमेय पाटकर, प्रा. पूनम गावडे, प्रा. दीपेश गावडे, मुख्य लिपिक निखिल सोनार, विद्यार्थी प्रतिनिधी रोहित सावंत, ग्रेसी पिंटो, रुपेश शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराची व्यक्तिमत्व विकासातून सामाजिक विकास, पर्यावरण दृष्टिकोनातून ग्रामीण भागाचे संरक्षण, ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती, स्वच्छतेतून समृद्धीकडे, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांची वाढ करणे आणि उत्कृष्ट नागरिक निर्माण करणे ही उद्दिष्टे आहेत.

You cannot copy content of this page