मालवण ता.१८-: तळाशीलच्या समुद्रात मिनी पर्ससीनद्वारे माच्छिमारी करण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या गंगाराम कृष्णा पाटील यांच्या हेरंब १ या नौकेवर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाई करीत ती नौका जप्त केली. जप्त करण्यात आलेली मिनी पर्ससीन नौका मालवण बंदरात उभी करून ठेवण्यात आली असून या नौकेवर सागरी कायद्या अन्वये उद्या कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी दिली आहे.
या संबंधीचे अधिक वृत्त असे की, मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर पर्ससीन मच्छिमारी नौकांचा उच्छाद सुरूच असून मत्स्य व्यवसाय विभागाने यावर कारवाईचाबडगा उचलावा अशी मागणी पारंपरिक मच्छिमारांनी सातत्याने केली आहे आज तळाशील येथील समुद्रात एक मिनी पर्ससीन नौका पारंपरिक मच्छिमारांना दिसून आल्यानंतर याबाबतची माहिती मालवणच्या मत्स्य व्यवसाय विभागाला पारंपरिक मच्छिमारांनी देत या मिनी पर्ससीन मच्छिमारी नौकेवर कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली . या मागणी नंतर मालवणच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीमती. तेजस्विता करंगुटकर, पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र लुडबे, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दीपेश मायबा यांनी शितल या गस्ती नौकेने जात तळाशील समुद्रात असलेल्या त्या मिनी पर्ससीन नौकेकडे चाल केली. यावेळी त्यांच्या सोबत पारंपारिक मच्छिमारांची नौकाही होती.
मत्स्य व्यवसाय विभाग कारवाई करण्यासाठी आपल्या दिशेने येत असल्याचे दिसताच त्या मिनी पर्ससीन नौकेने पळ काढण्यास सुरुवात केली मात्र, शितल गस्ती नौकेने त्याचा पाठलाग करून आचरे आडबंदर येथील समुद्रात त्या मिनी पर्ससीन नौकेवर कारवाई केली. ही मिनी पर्ससीन नौका गजानन कृष्णा पाटील यांच्या मालकीची असून हेरंब १ (क्रमांक IND-MH-5-MM- 3323 )
या नावाच्या नौकेमध्ये पर्ससीनचे जाळे तसेच इतर साहित्य सापडून आल्याची माहिती श्रीमती. करंगुटकर यांनी दिली आहे. या नौकेवर एक तांडेल तसेच पाच खलाशी होते. त्यांच्या जवळील मोबाईल मध्ये गिलनेट मच्छिमारीचा परवाना आढळून आला असला तरी प्रत्यक्षात नौकेमध्ये मिनी पर्ससीनचे जाळे मत्स्य व्यवसाय विभागाला सापडले आहेत. उद्या या नौकेवर रीतसर कारवाई करण्यात येणार असून हेरंभ १ सदर नौकेवर सागरी कायद्या अन्वये सहाय्य्क आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. स. अलगिरी यांचे कडे प्रतिवेदन दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती करंगुटकर यांनी दिली.
