रंगली विविध चित्रपटांची चर्चा
सिंधूरत्न कलावंत मंच, मालवण नगर पालिकेने केले होते आयोजन..
मालवण दि प्रतिनिधी
सिंधुरत्न कलावंत मंच यांच्यावतीने व मालवण नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला दुसऱ्या कोकण चित्रपट महोत्सव २०२३ मध्ये कोकणरत्न पुरस्काराने अभिजीत चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, दिगंबर नाईक, संतोष पवार, प्रभाकर मोरे यांना सन्मानित करण्यात आले असून कोकणची शान हा पुरस्कार देऊन लिना नांदगावकर यांना सन्मानित करण्यात आले. या कोकण चित्रपट महोत्सवात सरला एक कोटी, बापलेक, तमाशा लाईव्ह, गोष्ट एका पैठणीची, धर्मवीर मु. पो. ठाणे यांसारख्या चित्रपटांची चर्चा रंगली
मालवण नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात दुसरा कोकण चित्रपट महोत्सव २०२३ मोठ्या उत्साहात पार पडला मराठी चित्रपट, त्यातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी यांच्या चमकदार कामगिरीची दखल घेणारा हा सोहळा प्रथमच मालवणवासीयांनी एन्जॉय केला
या सोहळ्यासाठी सुत्रसंचालन दिगंबर नाईक व संदीप पाठक यांनी केले. यावेळी मान्यवरांचे स्वागत सिंधुरत्न कलावंत मंचचे अध्यक्ष विजय पाटकर व सचिव विजय राणे यांनी केले. पुरस्कार वितरण सोहळ्याला मालवणी गान्हाणे घालून सुरूवात करण्यात आली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हा पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, संदीप परब, अवि सामंत, गुरूनाथ मिठबावकर, अमेय शिंदे, राजेश गुंडे, डॉ. आनंद आंबरेकर, राजेंद्र सबनीस, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, गुरू राणे, योगीता प्रभू संजिव देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पुरस्कार विजेत्यांची नावे
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून नितीन सुपेकर (सरला एक कोटी), प्रेरणादायी चित्रपट म्हणून ‘गोष्ट एका पैठणीची’ याची निवड करण्यात आली. लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रथमेश परब तर लक्षवेधी अभिनेता म्हणून संदीप पाठक, विनोदी अभिनेता म्हणून प्रकाश भागवत, सहाय्यक अभिनेत्री म्हणून नम्रता संभेराव, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधव ( तमाशा लाईव्ह), सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ओंकार भोजने (सरला एक कोटी), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून प्रियदर्शनी इंदुलकर ( फुलराणी), विनोदी चित्रपट म्हणून ‘घे डबल लक्षवेधी चित्रपट म्हणून ‘बापलेक’ सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक म्हणून उमेश जाधव (धर्मवीर), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण वासुदेव राणे ( दगडी चाळ २) सर्वोत्कृष्ट कथा म्हणून ‘बापलेक’ युट्युबवर कोकणावर आधारीत गाणे ( मोरया रे ) प्रसिद्ध केल्याबद्दल डी. के. म्युझीक, शॉर्टफिल्म ‘पाळी’ उत्कृष्ट दिग्दर्शन अनिकेत मिठबावकर, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक मनिषा राजगीरे ( धर्मवीर ), उत्कृष्ट संगीतकार विजय गवंडे ( सरला एक कोटी, केवड्यांच पान तू), सर्वोत्कृष्ट पार्श्वगायीका मुग्धा कराडे (दगडी चाळ (२) उत्कृष्ट टेक्नीशियन म्हणून जयंत जठार (टाईमपास ३) यांनाही गौरविण्यात आले.
कोकण चित्रपट महोत्सवासाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल यावेळी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा सत्कार सिंधुरत्न कलावंत मंचाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना मुख्याधिकारी जिरगे यांनी मालवण पर्यटननगरीत हा कार्यक्रम होत असल्याबद्दल आपण आनंदी आहे. या सोहळ्याचा एक भाग होता आला यातून मालवणकारांना सिनेतारकांना प्रत्यक्षात पहाता आले यातून मालवण नगरपालिका दर्जेदार कार्यव – माचे नियोजन करू शकते हेही दिसून आलेले आहे. कोकण चित्रपट महोत्सव पुढील वर्षीही दिमाखदार साजरा होण्यासाठी आपण सहकार्य करू असे सांगितले. या महोत्सवामुळे मालवणचे नाव सातासमुद्रापार नेण्यासाठी मदत होणार आहे, असेही मुख्याधिकारी म्हणाले
यावेळी वेतोबा फेम उमाकांत पाटील, पॅडी कांबळे , मेघा घाडगे, कोकणचे बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण, पूजा सावंत , प्रथमेश परब तन्मय पटेकर संतोष पवार, शुभकर तावडे, मिरा जोशी, संचित चौधरी, अस्मीता देशमुख यांनी कलेचा आविष्कार सादर करत रसिकांची मने जिंकली.
