संकल्प प्रतिष्ठानच्या नाविण्यपूर्ण करवंटी हस्तकला प्रशिक्षणास प्रतिसाद…

⚡कणकवली ता.१८-:
संकल्प प्रतिष्ठान द्वारा गोपूरी, कणकवली येथे नाविण्यपूर्ण करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रशिक्षणात उपविभागीय अधिकारी, कणकवली जगदिश कातकर, गोपूरीचे सचिव विनायक मेस्त्री व इतर मान्यवर आदींनी भेट देऊन या नाविण्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा करून प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.

नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष मानतो. या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगात आणला जातो, मात्र करवंट्या (मोठ्या प्रमाणावर) जाळून टाकल्या जातात. समुद्र किनारी भागात नारळाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे, साहजिकच नारळाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे करवंट्या ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. या करवंट्या जाळण्याऐवजी त्यापासून सुंदर, आकर्षक उपयुक्त व मागणी असणाऱ्या वस्तूंची निर्मिती करता येते व हे एक अर्थार्जनाचे साधनही ठरू शकते. गरज आहे ती याकडे डोळसपणे पाहण्याची. दुर्दैवाने मात्र आपल्या भागात याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

गेले एक तप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकता विकास या क्षेत्रात प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या व त्या अनुषंगाने उद्योग, व्यवसाय, कृषी विषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करणाऱ्या संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) या संस्थेने ही बाब हेरून करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप व प्रमाणपत्र वितरण महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी रामचंद्र गावडे, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरादअली शेख, गोपूरीचे सचिव विनायक मेस्त्री, प्रशिक्षक श्री आंनद इ. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

हे प्रशिक्षण प्रात्यक्षिकवर आधारित होते व यासाठी तामिळनाडू राज्यातील या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रशिक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थीही सहभागी झाले होते.

अशा प्रकारचे प्रशिक्षण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हावे यासाठी गेले 4 वर्ष प्रयत्नशील होतो. किंबहुना जिल्ह्यातील हे पहिलेच प्रशिक्षण असावे. प्रशिक्षण पश्चात प्रशिक्षणार्थींना संकल्प प्रतिष्ठान द्वारा मार्गदर्शन व मार्केटिंगसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. असे संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरादअली शेख यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरादअली शेख, सचिव अमोल भोगले, कार्यक्रम समन्वयक अमोल परब, असगर शहा व गोपूरीच्या कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.

You cannot copy content of this page