चिवला बीच राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी आतापर्यत एक हजार स्पर्धकांची नोंदणी…

⚡मालवण ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 16 व 17 डिसेंबर रोजी 13 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन
मालवण चिवला बीच वर करण्यात आले आहे. 26 जिल्ह्यातून आतापर्यन्त एक हजार स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 13 वर्ष ही स्पर्धा होत असून स्थानिकांसह अनेकांचे तसेच मालवण नगरपरिषद प्रशासनाचे सहकार्य स्पर्धेला लाभत आहे. यावर्षी रोटरी क्लब मालवण तसेच अन्य काही सामाजिक स्तरावरून सहकार्य लाभले आहेत.

13 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी 26 जिल्ह्यातील, तसेच देशभरातून विविध राज्यातील 4 वर्षे ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 1000 हून अधिक स्पर्धकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.

विशेषतः भारतातील सर्वात मोठी आणि गेली 12 वर्षे नावलौकिक असलेल्या ह्या स्पर्धेत प्रथमच आजोजित केलेल्या 10 कि.मी. सागरी जलतरण स्पर्धेमध्ये जलतरणपट्टुंचा कस लागणार आहे. तसेच 10 कि.मी. स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करण्याऱ्या स्पर्धकांना राष्ट्रिय व आतरराष्ट्रीय विविध खुल्या सागरी जलतरण स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी मदत होणार आहे.

ह्या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे देशभरातील फक्त एकमेव स्पर्धेमध्ये दिव्यांग जलतरणपटू साठी विशेष गटाचे आयोजन स्पर्धेत करण्यात येते. तसेच आलेले सर्व दिव्यांग जलतरण स्पर्धक सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करतात.

यावर्षी चिवला बीच येथे प्रथमच अंडर वॉटर स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण सागरी जलतरण संघटना यांच्या वतीने फिन्स सागरी जलतरण हा स्पर्धा प्रकार प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. निवडक व निमंत्रित स्वरूपात प्रत्येक राज्यातील स्पर्धक यात सहभागी असणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडूंकरिता मालवण नगरपरिषद, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि चिवला किनारा जलक्रीडा पर्यटन सेवा सह संस्था मर्या मालवण यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिल्या बिच व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन या जलतरण स्पर्धे निमित्ताने करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा 15 डिसेंबर रोजी सेवांगण समोरील चिवला बिच येथे दुपारी ४ वाजल्यापासून आयोजित करण्यात आलेली आहे. बिच व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अमित हर्डीकर (+९१ ८५५४०१७१८४) यांच्याशी संपर्क साधावा.

शनिवार 16 डिसेंबर रोजी चिवला बिच, मालवण येथे सकाळी 7 वाजल्यापासून 5 कि.मी., 3 कि.मी., 2 कि.मी., 1 कि.मी. आणि रविवार 17 डिसेंबर रोजी 10 कि.मी., 500 मी., दिव्यांग गट, फिन्स (FINS) सागरी जलतरण स्पर्धेची सुरवात मान्यवरांच्या हस्ते समुद्राला श्रीफळ अर्पण करून होणार आहे.

स्पर्धेतील नोंदणीकरिता काळबादेवी एक्सोटिका, चिवला बिच येथे 15 डिसेंबर दुपारी 3 वाजल्यापासून 5 कि.मी., 3 कि.मी., 2 कि.मी., 1 कि.मी. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी नाव नोंदणी पूर्ण करावी. तर 16 डिसेंबर रोजी 10 कि.मी., 500 मी., दिव्यांग गट, फिन्स (FINS) सागरी जलतरण स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी नाव नोंदवावीत .जलतरण स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किशोर पालकर (+९१ ९८१९१६९०२४) व नील लब्दे (+९१ ९६६५३६१७३६) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page