स्टॉल लावू न दिल्यास प्रसंगी उपोषण करू; व्यवसायिकांचा इशारा..
⚡मालवण ता.१४-: मालवणात साजऱ्या झालेल्या नौदल दिनापूर्वी मालवण बंदर जेटी परिसरातील बंदर विभागाच्या जागेतील सर्व स्टॉल हटविण्यात आले असताना नौदल दिन संपल्यावर आता सुरु असलेल्या पर्यटन हंगामाच्या दृष्टीने स्थानिक स्टॉल व्यवसायिकांनी जेटी नजीकच्या किनाऱ्यावर तात्पुरते लावलेले काही स्टॉल काल रात्री बंदर विभागाचे अधिकारी हटविण्यास गेले असता वादंग निर्माण झाला. याबाबत आज सतीश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली स्टॉल व्यवसायिकांनी बंदर अधिकारी श्री. गोसावी यांची भेट घेतली असता किनाऱ्यावर असलेल्या बंदर विभागाच्या विश्रामगगृह बंगल्यासमोरील किनाऱ्यावर स्टॉल लावता येणार नसल्याचे गोसावी यांनी सांगितले. मात्र स्टॉलधारक जास्त असल्याने बंगल्यापासून पुढील किनाऱ्यापर्यंत स्टॉल लावण्यास मिळावेत, अशी मागणी व्यवसायिकांनी केली. याबाबत बंदर अधिकारी गोसावी यांनी याबाबत तहसीलदारांशी बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, बंदर विभागाने बंगल्यापासून पुढील किनाऱ्यापर्यंत स्टॉल लावण्यास परवानगी न दिल्यास प्रसंगी उपोषण केले जाईल, असा इशारा स्टॉल व्यवसायिकांच्या वतीने सतीश आचरेकर यांनी दिला आहे.
नौदल दिना पूर्वी मालवण बंदर विभागाकडून मेरी टाइम बोर्डाच्या आदेशाने मालवण बंदर जेटी परिसरातील बंदर विभागाच्या जागेतील व किनाऱ्यावरील स्टॉल हटविण्यात आले होते. मात्र यामुळे पावसाळी बंदी कालावधीपासून सलग पाच ते सहा महिने स्टॉल बंद ठेवावे लागल्याने स्टॉल धारक व्यवसायिकांना नुकसान सहन करावे लागले. यामुळे दिवाळीच्या पर्यटन हंगामात काही स्टॉल धारकांनी किनाऱ्यावर वाळूमध्ये तात्पुरते छोटेखानी स्टॉल उभारत व्यवसाय सुरु केला होता. मात्र हे स्टॉल हटविण्यासाठी बंदर अधिकारी गेले असता वरिष्ठांच्या सुचनेनुसार हे स्टॉल किनाऱ्यावर असलेल्या बंदर विभागाच्या विश्रामगृह बंगल्यापासून काही अंतर सोडून खासगी पार्किंग असलेल्या किनारी भागात लावण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार काही स्टॉल सुरु असून डिसेंबर मधील पर्यटन हंगाम लक्षात घेत पूर्वीच्या इतरही स्टॉल व्यवसायिकांनी स्टॉल लावले. काही स्टॉल विश्रामगृह बंगल्याच्या समोरील जागेत येत असल्याने हे स्टॉल हटविण्यावरून काल रात्री बंदर अधिकारी व स्टॉल व्यावसायिक यांच्यात वादंग झाला. या पार्श्वभूमीवर आज किनाऱ्यावर स्टॉल लावणाऱ्या व्यवसायिकांनी एकत्र येत बंदर अधिकारी गोसावी यांची भेट घेतली तसेच किनाऱ्यावरील जागेची पाहणी केली. यावेळी सतीश आचरेकर, रोहन आचरेकर, अरुण तोडणकर, जॉनी फर्नांडीस, एजाज मुल्ला, आनंद आचरेकर, प्रसाद सरकारे, हेमंत रामाडे, दीपक तांडेल, स्वप्नील आचरेकर, अनमोल आढाव, राजू वाघ, हेमंत सारंग, संतोष गोवेकर, फातिमा मुजावर, दीपाली मेथर, हेलन फर्नांडिस, नागेश परब, खुशबू आचरेकर, विल्सन फर्नांडीस, नुरू मुजावर, दीपाली आचरेकर, जयश्री सकपाळ, वैष्णवी कुबल, जर्ना वाघ बानी सारंग, जेनीफर फर्नांडिस, जेनेव्हा ब्रिटो, स्नेहा तोडणकर, दादा जोशी, विनिता पेडणेकर, मोहिनी आचरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सतीश आचरेकर म्हणाले, ज्यावेळी बंदर विभागाने बंदर जेटी परिसरातील स्टॉल हटविण्याची सूचना केली, त्यावेळी आम्ही सर्व स्टॉल धारकांनी बंदर विभागाला सहकार्य करून स्वतःहून स्टॉल हटविले. नौदल दिनानंतर स्टॉल धारकांना जागा देण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आम्ही बंदर विभागाचे वाहनतळ, शेड व इतर बांधकाम सोडून किनाऱ्यावर वाळूमध्ये तात्पुरते स्टॉल लावले आहेत. आम्ही स्टॉलधारक बंदर परिसरातील सर्वात पहिले व्यावसायिक असून गेली २० वर्षे स्टॉल चालवत आहोत. आम्हाला किनाऱ्यावर स्टॉल लावण्यास परवानगी मिळावी, असे सतीश आचरेकर म्हणाले.
यावर बंदर अधिकारी गोसावी यांनी काही स्टॉल किनाऱ्यावर असलेल्या बंदर विभागाच्या बंगल्यासमोरच्या जागेत लावल्याने आम्ही ते हटविण्याबाबत सूचना केल्या. बंगल्यासमोरच्या जागेत स्टॉल लावता येणार नाही, बंगल्यापासून ५० फुट अंतर सोडून पुढील किनाऱ्यावर स्टॉल लावण्यास हरकत नाही, असे सांगितले. यावर सतीश आचरेकर यांनी सध्या ज्या ठिकाणी स्टॉल लावले आहेत ती जागा आम्हाला पुरत नाही, तर त्या पुढील जागेत मच्छिमारी नौका उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे बंगल्यापासूनची जागा आम्हाला स्टॉल लावण्यास मिळावी, अशी मागणी केली. बंगलेही जुने झालेले असून त्यांची दुरावस्था झाली आहे, तिथे जाण्यास आवश्यक वाट सोडण्यास आम्ही तयार आहोत, असेही आचरेकर म्हणाले. याबाबत स्टॉल धारकांची तहसीलदारांसमवेत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे बंदर अधिकारी गोसावी यांनी सांगितले.
मात्र, आम्ही सर्व जुने स्टॉलधारक असून किनाऱ्यावरील सध्याची जागा आम्हाला पुरत नाही, त्यामुळे बंगल्यापासूनची जागा मिळणे आवश्यक आहे, बंदर विभागाने याबाबत आवश्यक सहकार्य न केल्यास आम्ही उपोषणास बसू असा, इशारा सतीश आचरेकर यांनी यावेळी दिला.
