डॉ. विनोद कुमरे: ‘गाबीत समाज व फागगीते’ या पुस्तकाचे प्रकाशन..
⚡मालवण ता.१४-:लोकसाहित्याचा अभ्यास फार आवश्यक आहे. कारण लोकसाहित्याने जगाचे इतिहास बदलले आहेत. ‘गाबीत समाज आणि फागगीते’ या पुस्तकातून आज जगाला गाबीत समाजाची ओळख झाली आहे. या पुस्तकातून लोकसाहित्य संकलनाचे ऐतिहासीक काम डॉ. अंकुश सारंग आणि प्रा. डॉ. उज्वला सामंत यांनी केले आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. विनोद कुमरे यांनी येथे केले.
डॉ. अंकुश सारंग आणि प्रा. डॉ. उज्वला सामंत लिखित ‘गाबीत समाज आणि फागगीते’ या पुस्तकाचे प्रकाशन मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कुमरे बोलत होते. यावेळी प्राचार्य एस. ए. ठाकुर, कार्याध्यक्ष श्रीपाद पंतवालावलकर, चारुशीला देऊलकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, प्रा. कैलास राबते, पत्रकार आनंद लोके, महेंद्र पराडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी लेखक अंकुश सारंग म्हणाले, निसर्ग सौंदर्याने सजलेल्या कोकणला लोकनाट्याची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. राजापूर, जुवे-जैतापूर, विजयदुर्ग, गिर्ये बांदेवाडी, तिर्लोट- आंबेरी, नाडण वीरवाडी, मॉड, जामसंडे, कट्टा, मळई, देवगड-आनंदवाडी, मोर्वे, वानिवडे, आचरे, मालवण, वेंगुर्ले, गोवा, कारवार समुद्रकिनाऱ्यावरील गाबीत मच्छीमार समाजाने फागनाट्य प्रकार जोपासालेला आहे. फागांचा हा उत्सव होळी ते धुलीवंदन असा आठ ते दहा दिवस चालतो. फागनाट्यामधून गाबीत समाजाच्या लोकसंस्कृतीचे उत्तम दर्शन घडते, असेही सारंग म्हणाले. फागगीतातील मालवणी शब्द व त्यांचा अर्थ समजणे सोपे जावे यासाठी सहलेखिका डॉ. उज्वला सामंत यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रंथ प्रकाशनासाठी प्राचार्य ठाकुर यांनी अमूल्य सहकार्य केले. डॉ. सूर्यकांत आजगावकर यांनी अभ्यासपूर्वक प्रस्तावना दिली. तसेच डॉ. कुमरे यांनी हा ग्रंथ अभ्यासक्रमात आणण्यासाठी महत्वाचे योगदान दिले, या सर्वांचा मी आभारी आहे, असेही सारंग म्हणाले.
यावेळी प्रा. डॉ. उज्वला सामंत म्हणाल्या, फाग म्हणजे फल्गु किंवा गुलाल. लाल गुलाल उधळीत घुमटांच्या तालावर गायिली जाणारी गीते म्हणजे फागगीते. लोकसाहित्याचे संकलन ही सोपी गोष्ट नाहीय. परंतु अंकुश सारंग यांनी अत्यंत चिकाटीने फागगीतांचे संकलन तब्बल २० वर्षे संकलन केलेय. तरुणांनी हे पुस्तक अभ्यासावे असा आमचा आग्रह राहील, असेही त्या म्हणाल्या. यावेळी आनंद लोके, प्राचार्य डॉ. ठाकूर, चारुशीला देऊलकर यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक प्रा. सुमेधा नाईक तर सूत्रसंचालन प्रा. पी. बी. खरात यांनी केले.
