जानवली परबवाडी फाट्यावरील घटना: कार चालकाचे पलायन..
⚡कणकवली ता.१४-: मुंबई -गोवा महामार्गावर कणकवली नजीक जानवली परबवाडी फाट्यावर गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिल्वर कलरच्या स्विफ्ट कारने दुचाकीला मागवून जोरदार धडक दिली. या अपघातात सौ. अंजली अमित साळवी (वय ३६, रा. शिवाजीनगर कणकवली) यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला आहे.हा अपघात गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई गोवा महामार्गावर जाणवली परबवाडी येथे आपली बहिण नूतन दळवी यांना सोडण्यासाठी अंजली साळवी या दुचाकी घेवून गेल्या होत्या. त्या ठिकाणी नूतन दळवी या दुचाकी वरुन उतरल्यानंतर मागून येणाऱ्या भरधाव कारने ठोकर दिली. त्यात अंजली साळवी यांना जवळजवळ वीस ते तीस फूट फरपटत घेऊन कारचालक कारसह पसार झाला आहे.या जखमी अंजली साळवी यांना त्यांचे भावोजी ॲड.संतोष दळवी यांनी कारमधून कणकवली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.
या अपघाताचे वृत्त समजतात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस रुपेश गुरव,स्वप्निल जाधव,भूषण सुतार आदी घटनास्थळी दाखल झाले.अपघाताबाबत माहिती समजताच रुग्णालयात ॲड.भालचंद्र पाटील,माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर,चेतन मुंज,चेतन अंधारी,बाळा पाटील,सिद्धेश बांदेकर,संकेत बांदेकर आदींनी धाव घेतली होती.
त्यानंतर पंचनामा करून अंजली साळवी हीचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे. घटनेच्या वृत्त समजतात कणकवली येथील रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अंजली साळवी यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, भाऊ ,बहीण, आई असा परिवार आहे.
