अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या…

सिंधुदुर्गनगरीत घुमला अंगणवाडी ताईंचा आवाज:मोर्चा काढत शासनाचे वेधले लक्ष..

सिंधुदुर्गनगरी ता ११ मानधन नको- वेतन हवे, भाऊबीज नको- बोनस हवा, या मागणीसह अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा. या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला.

अंगणवाडी कर्मचारी महासभेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडोंच्या संख्येने जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन पातळीवर प्रलंबित आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेली अनेक वर्षे आंदोलने, मोर्चा काढण्यात आले. तरीही शासन त्याकडे अद्याप दुर्लक्ष करीत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ४ डिसेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आणला. यावेळी शासन विरोधी घोषणा देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सिंधुदुर्ग नगरी परिसर दणाणून सोडला. तर आम्हाला मानधन नको वेतन हवे, भाऊबीज नको बोनस हवा, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, २६ हजार रुपये मानधन द्यावे. अश्या विविध मागण्यांकडे यावेळी घोषणा देऊन शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांच्याकडे देण्यात आले. तसेच सुरू असलेल्या अधिवेशनात सरकारने आपल्या मागण्यांबाबत योग्य निर्णय न घेतल्यास १६ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी कमलताई परळकर यांनी दिला आहे.
अंगणवाडी कर्मचारी याना सरकारी नोकर मानावे, २६ हजार रुपये मानधन द्यावे.मानधनाच्या निम्मी रक्कम दरमहा पेन्शन मिळावी, ३ लाख ग्रॅच्युइटी द्यावी व आहाराचे दर तिप्पट करून कूपोषण थांबवावे. आदि मागण्या कर्मचाऱ्याच्या वतीने शासनास दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत.

You cannot copy content of this page