राजेंद्र गोसावी:नगरवाचनालयात साहित्य परिचय कार्यक्रम..
कणकवली 2 डिसेंबर (प्रतिनिधी)-
साहित्यिक बनण्यासाठी लेखन व वाचनाची आवड फार महत्वाची असते. साहित्यिकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे नवोदित साहित्यिकांनी वाचन केले पाहिजे. त्यामुळे तुमच्या लिखाणात व विचारांमध्ये प्रगल्भता येईल, असे प्रतिपादन कवी राजेंद्र गोसावी यांनी केले.
कणकवली येथील नगरवाचनालयातर्फे वाचनालयात सभागृहात साहित्य परिचय कार्यक्रम आयोजित केला. याच्या उद्घाटनप्रसंगी श्री. गोसावी बोलत होते. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, कार्यकारिणी सदस्य महेश काणेकर, पी. जे. कांबळे, वैयजंती करंदीकर, ज्येष्ठ कवी उदय सर्पे, स्नेहा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र गोसावी यांनी लहानपणीची शाळा, लेक माझी, अशी ही दिवाळी, लहानपणीचा बाजार, शाळा आठवता झिला, साद घालता तुका ही माझी माती या कवितांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. दुर्वा पवार हिने राजभाषा मराठी यासह अन्य कवितांचे वाचन केले. विधी चिंदरकर व मृण्मयी कामतेकर, समृद्धी धुरी यांनी कवितांचे वाचन केले. उदय सर्पे यांनी कविता कशा लिहाव्यात याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डी. पी. तानवडे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
