⚡मालवण ता.०१-: नौदल दिनानिमित्त तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर आज चौथ्या दिवशीही नौदलाने विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. युद्धनौका, हेलीकॉप्टर, लढाऊ विमाने, स्पीडबोटी, पॅराशूट आदींच्या साहाय्याने नौदलाच्या जवानांनी सादर केलेली ही प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आजही ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केल्याने संपूर्ण तारकर्लीचा किनारा फुलून गेला होता.
मालवणात साजऱ्या होणाऱ्या नौदल दिनानिमित्त तारकर्लीच्या समुद्रात नौदलाच्या अनेक नामांकित युद्धनौका दाखल झाल्या असून या नौकांद्वारे नौदलाच्या ४ रोजी सादर होणाऱ्या प्रात्यक्षिकांची रंगीत तालीम सुरु आहे. असून आज चौथ्या दिवशीही विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी प्रारंभी नौदलाच्या जवानांनी आकाशात उंचावरून हेलिकॉप्टर मधून उद्या मारत पॅराशूटच्या साहाय्याने किनाऱ्यावर लँडिंग केले. यावेळी जवानांनी आकाशात भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज आणि नौदलाचा ध्वज फडकवला तर युद्धनौकेतून आणि लढाऊ विमानातून बरसवण्यात आलेले आगीचे गोळे सर्वांनाच अचंबित करून गेले. तसेच समुद्रात शत्रूच्या चौकीवर केलेल्या बॉम्ब ब्लास्टमुळे समुद्रातून आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट आकाशाकडे झेपावले.
ही प्रत्यक्षिकांची रंगीत तालीम पाहण्यासाठी तारकर्ली येथे गेले दोन दिवस नागरिकांची तोबा गर्दी होत असून आजही हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
