मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहरातील रेवतळे येथील लक्ष्मी नारायण शिरोडकर (६०) या वृद्धेचा मृतदेह तिच्या राहत्या घराशेजारी असणाऱ्या विहिरीत आज शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांना आढळून आला तिने आजाराला कंटाळून आत्महत्या केली असावी असा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण रेवतळे येथील लक्ष्मी शिरोडकर या आपल्या कुटूंबासमवेत राहतात आज शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संतोष शिरोडकर हे सकाळी पाणी काढण्यासाठी विहिरीकडे गेले असता त्यांना लक्ष्मी शिरोडकर यांचा मृतदेह विहरीत तरंगताना दिसला. शिरोडकर कुटुंबीयांनी मालवण पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर, महादेव घागरे हे घटनास्थळी दाखल झाले होते
आत्महत्या केलेल्या लक्ष्मी शिरोडकर यांच्याकडे पोलीसांना चिट्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मालवण पोलीसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
लक्ष्मी शिरोडकर यांच्या पश्चात मुलगा, सून, दीर, भावजय, पुतणे असा परिवार आहे. सागरी महामार्ग येथील तेजस किराणा स्टोअर्सचे मालक तेजस शिरोडकर यांच्या त्या आई होत. विच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. शुक्रवारी दुपारी रेवतळे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
