किनारपट्टीवर जीव रक्षकांसह अन्य सुविधा द्याव्यात…

ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची मागणी ; तहसीलदार पोलीस निरीक्षकांचे वेधले लक्ष…

⚡मालवण ता.१७-:
सध्याच्या पर्यटन हंगामात तारकर्ली येथील समुद्रात पर्यटक बुडून मृत्यू पावण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात जीवरक्षक, सुरक्षा पथक नियुक्तीची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्यावतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सादर करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या दिवाळी सुटीचा आनंद लुटण्यास येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांत तारकर्लीच्या समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या जीवनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गोव्याच्या धर्तीवर जीवरक्षक, सुरक्षा पथक, बोट, टेहळणी मनोरे उभारण्यात येतील असे जाहीर केले होते. मात्र गेल्या काही वर्षात याबाबतची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आतापर्यंत घडलेल्या दुर्घटनांचा आढावा घेत आवश्यक उपाययोजना राबविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, प्रमोद कांडरकर, राजेश लब्दे, महेश मयेकर, शिवाजी फाटक, रोहित हडकर, रितेश सावंत, अर्जुन परब, महिला जिल्हा संघटक मीनल पार्टे, प्रेरणा जुवेकर, सीमा धुरी, तुकाराम माळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page