⚡सावंतवाडी ता.१७-: कोरोना काळात रद्द केलेले थांबे पुन्हा मिळण्यासाठी तसेच रेल्वे टर्मिनस च्या दुसऱ्या टप्प्याच्या निधीचे उत्तर मिळण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन विरोधात येत्या 26 जानेवारी रोजी पालघर ते सावंतवाडी असे साखळी आंदोलन छेडण्याचा इशारा मिहीर मठकर व सहकाऱ्यांनी दिला आहे.
या आंदोलनात सामाजिक संस्था मंडळे व सावंतवाडीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे आज सावंतवाडी स्टेशनवर आले असता श्री मठकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेत कोरोना काळात बंद झालेल्या एक्सप्रेस गाड्या तसेच रेल्वे टर्मिनस च्या दुसऱ्या टप्प्याच्या निधीबाबत विचारणा केली तसेच निवेदनही दिले मात्र त्यांच्याकडून अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा तसेच रेल्वे टर्मिनस चे प्रश्न सुटावेत यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याने अखेर श्री मटकर व सहकार्याने साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. यासंदर्भात श्री मटकर यांनी पत्रक प्रसिद्ध दिले असून त्यात असे म्हटले आहे की सावंतवाडीकरांना कोकण रेल्वे कडून नेहमीच दुय्यम स्थान मिळाले आहे या ठिकाणी टर्मिनसचा दर्जा मिळूनही एक्सप्रेस गाड्यांना थांबा नाही तसेच टर्मिनस चे कामही अर्धवट आहे एकूणच या सर्व प्रश्नांची उत्तरे कोकण रेल्वे कडून मिळावा यासाठी वेळोवेळी प्रयत्न झाला परंतु नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत आजही तोच प्रकार या ठिकाणी घडला त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी येत्या 26 जानेवारी रोजी सकाळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
