शाखीय संगीत मैफिल आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांचा गंधर्वगान  राजवाडा येथे २५ नोव्हेंबरला…

⚡सावंतवाडी ता.१७-:
शाखीय संगीत मैफिल आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांचा गंधर्वगान सावंतवाडी राजवाडा येथे शनिवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने नाम. दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यसह गोवा राज्यातील अनेक रसिकांना मंत्रमुग्ध करणारी मैफिल आयोजित करण्यात आली आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत ना दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी माहिती दिली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर,आबा केसरकर, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.
पोकळे म्हणाले,कित्येक वर्ष सिंधुदुर्गवासी ज्या मैफिलीची आतुरतेने वाट पहात आहेत त्या पं. मुकुल शिवपुत्र यांच्या मैफिलीसंदर्भात आयोजन करण्यात आले आहे.पं. कुमार गंधर्व यांचे सुपुत्र आणि प्रथम शिष्य असलेले पं. मुकुल शिवपुत्र हे हिंदुस्थानी अभिजात शास्त्रीय संगीताच्या दुनियेत प्रथमस्थानी विराजमान आहेत. 
मुलांनी आयुष्यात आपल्या एक पाऊल पुढे असावं असं प्रत्येक आई वडीलांना वाटतं. त्याबाबतीत कुमारजी भाग्यवान, कुमारजींनी अभिजात संगीत ज्या उंचीवर नेऊन ठेवलं तिथून मुकुलर्जीचं शिक्षण सुरू झालं. त्यामुळे पु. लं. च्या आणि वसंतराव देशपांडेंच्या शब्दांत सांगायचं तर मुकुल ने हमीच कुमारच्या खांद्यावर बसून गातो. गाण्यात कुमारजींच्या कितीतरी पुढे असलेले मुकुलजी हे शास्त्रशुद्ध गायकीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी संगीतात केलेले प्रयोग संगीतक्षेत्रात शिरसावंद्य मानले जातात.

पंडितजी संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि संत साहित्याचे जाणकार आहेत. संस्कृत मध्ये काव्यरचना करणारे पंडितजी हे भारतात सध्या एकमेव आहेत. श्रुतिशास्त्राचा सखोल अभ्यास हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्रय, ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर अशा तीन मातब्बर घराण्यांची गायकी ज्यांच्या कंठात माता सरस्वतीच्या रूमाने वसली आहे असे पंडितजी साक्षात गंधर्व म्हणूनच ओळखले जातात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीता बरोबरच त्यांनी कर्नाटक संगीताचे शिक्षण पं. एम. डी. रमनाथन यांच्याकडून मद्रास येथे कलाक्षेत्रात राहून घेतले आहे. पं. के. जी. गिन्डे यांच्याकडून त्यांनी धृपद धमारचे शिक्षण घेतले. तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये प्रा. वसंत बापट यांच्याकडून ते संस्कृत शिकले. भुतीशास्त्रकार आचार्य पं. बाळकृष्ण गंगाधरपंत आचरेकर यांच्याकडून त्यांनी श्रुतीशारखाचे रीतसर शिक्षण घेतले आहे बावीस श्रुतींच्या संवादिनीवर त्यांचं संशोधन सुरू आहे. ‘सुसंवादीनी’ हा त्यांचा जीवाभावाचा प्रकल्प आहे. 

 पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभरात होणान्या अनेक कार्यक्रमांपैकी काही कार्यक्रम आवर्जून ग्रामीण भागात आयोजित करण्याची इच्छा पंडितजींनी व्यक्त केली आणि आम्ही सुंदरनगरीत एक मैफिल व्हावी यासाठी पंडितजींकडे विनंती केली. पंडितजींनी तत्काळ होकार देऊन कोकणाविषयी असलेली आपुलकी आणि सावंतवाडीशी असलेलं नातं अधोरेखित केलं. आदरणीय पंडितजी आणि अभिजात रागदारी संगीत दोन्हीविषयी आस्था असल्याने आम्ही यावर्षी हा गंधर्वगान योग जुळवून आणला आहे त्रिपुरारी पौणिमेपूर्वीचा शनिवार म्हणजेच २५ नोव्हेंबर ही तारीख सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मैफिलीसाठी निश्चित केली आहे.
 

विशेष मैफिल कोकणातील एक निसर्गरम्य शहर सावंतवाडी म्हणजेच सुंदरनगरीत आयोजित करण्यामागे संगीत रसिकांना श्रवणीय आणि प्रेक्षणीय अशी दुहेरी मेजवानी देण्याचा हेतू आहे. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार प्रसारासाठी आणि संवर्धनासाठी पं. मुकुल शिवपुत्र जे प्रयत्न करीत आहेत त्यात आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. पं. मकुल शिवपुत्र अभिजात संगीत अकादमी’ आणि पं. कुमार गंधर्व गुरुकुलमच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा हीच त्या गची भावना. अशा सुरेल सोहळ्यात आपला सहभाग आनंददायी असेल,  सर्व संगीत रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजन पोकळे यांनी केले आहे.

मा. नाम. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी आयोजन व संपर्क :राजन पोकळे, मा. ना. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ,श्रीपाद चोडणकर, संगीत मित्रमंडळ, सावंतवाडी,
मनोज मणेरीकर, मारवा क्रिएटीव्हज ट्रस्ट,  निलेश मेस्त्री, सदगुरु संगीत मित्रमंडळ, सावंतवाडी, सौ. मंजिरी घोपेश्वरकर, सूरश्री आणि नाट्यदर्शन, सावंतवाडी,  प्रदिप शेवडे, अध्यक्ष, नादब्रह्म,  प्रायोजकत्व :. नाम. दिपकभाई केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडी, यांनी केले आहे.

You cannot copy content of this page