⚡कणकवली ता.१७-: सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेच्या ‘उत्तम-सर्वोत्तम, राज्यस्तरीय काव्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून हा पुरस्कार प्रा. सिद्धार्थ तांबे यांच्या ‘सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने’ या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.
परिवर्तनशील व कृतिशीलता जपणारा सामाजिक कार्यकर्ता, कवी उत्तम पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘उत्तम सर्वोत्तम’ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ एका सर्वोत्तम काव्यसंग्रहाला दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार प्रा. सिद्धार्थ तांबे यांच्या ‘सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ₹ ५०००/- , शाल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.
सम्यक साहित्य संसद ही मराठी वाङमयीन क्षेत्रात अग्रेसर असून या संस्थेतर्फे आ. सो. शेवरे जीवनगौरव व उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. मराठी वाङमय क्षेत्रातील उत्कृष्ट काव्यसंग्रहाची निवड करून, काव्यसंग्रह व कवीचा सन्मान करीत आहेत. वर्ष २०२३ या वर्षी हेतकर्स पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या, कवी सिद्धार्थ तांबे यांच्या ‘सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने’ या काव्यसंग्रहाची निवड केली आहे. प्रा. सिद्धार्थ तांबे हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, शिवडाव (ता. कणकवली) या गावचे सुपुत्र असून ते आरोंदा हायस्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. प्रा. सिद्धार्थ तांबे यांचा पिंड कार्यकर्त्याचा असून विविध चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध आहे. छात्रभारती व दर्पण सांस्कृतिक मंचाद्वारे त्यांनी तत्कालिक प्रश्नांवर अनेक आंदोलने, मोर्चा, लढ्यात व साहित्यिक उपक्रमात सहभाग व कार्य केले. धम्मशिबीर, प्रवचन श्रुंखला, चर्चासत्र, परिसंवाद, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक यांसारख्या उपक्रमांद्वारे समाजाभिमुख कार्य केले. प्रसंवादच्या वार्षिकांकाच्या निर्मीतीतही कवी सिद्धार्थ तांबे यांचा सक्रिय सहभाग आहे.
‘सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने’ हा कवितासंग्रह अल्पावधीतच वाचकांच्या पसंदीला उतरला असून या काव्यसंग्रहाने महाराष्ट्राच्या वाङमयीन क्षेत्रात आपली अमीट नाममुद्रा उमटविली आहे. त्यांना, वामनराव गंगाधर रुपवते ट्रस्टचा ‘महाकवी अश्वघोष राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’, विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशनचा ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ व भीमाई ट्रस्टचा ‘ महामाता रमाई काव्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सम्यक साहित्य संसदने, प्रसिद्ध झालेल्या बर्याच कवितासंग्रहाचा धांडोळा घेऊन त्या कवितासंग्रहातून ‘सूर्योन्मुख शतकाच्या दिशेने’ या कवितासंग्रहाची ‘उत्तम सर्वोत्तम’ या राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी निवड केली आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हातून केले जाईल, अशी माहिती सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष इंजि. अनिल जाधव व कार्यवाह राजेश कदम यांनी दिली.
