अगोदर रक्कम जमा करा, नंतरच पीक विमा भरण्यास सांगा…

रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे : विमा रक्कम देण्यासाठी शासनाकडे निधी नाही की यंत्रणा..?

⚡बांदा ता.१७-: प्रधानमंत्री फळपीक योजने अंतर्गत इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून मिळणारी नुकसान भरपाई जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. यापूर्वी सदर विमा भरपाई रक्कम ऑगस्ट महिन्यात मिळायची परंतु सध्या नोव्हेंबर महिना उजाडतो. विमा रक्कमेपासून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात अगोदर रक्कम जमा करा आणि नंतरच यावर्षीचा विमा भरण्याचे आवाहन करा. यासाठी शासनाकडे यंत्रणा नाही का निधी नाही, असा सवाल रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी प्रशासनास केला आहे.


जिल्ह्यातील काजू व आंबा बागायतदार शेतकरी एकाच वेळी विमा भरतो. मात्र विमा रक्कम शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने सर्कल प्रमाणे मिळते. शासनाकडून आंब्याचा वेगळा व काजूचा वेगळी विमा रक्कम काही अंतराने मिळते. मुख्य म्हणजे अगोदरचा पिक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा न करता पुढचा विमा भरण्याचे आवाहन करत शासन शेतकऱ्यांनाच 31 नोव्हेंबर अशी डेडलाईन देते. त्यामुळे शासन दरबारी नेमके काय चालले असा सवाल सुरेश गावडे यांनी केला आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत आंबा, काजू बागायतींच्या मेहनती म्हणजे साफसफाई, औषध फवारणी अशी कामे करावयाची आहे. बागायती मधून उत्पन्न यायला सुरुवात झाल्यानंतर शेतकरी ही सर्व कामे करणार का? बागायतदार जवळ पैसे नसतील तर बागांची निगा कशी राखणार हे न सुटणारे कोडे शासनाने सोडवावे. तसेच आंबा व काजूचा टप्प्याटप्प्याने सर्कल प्रमाणे न देता एकाच वेळी बागायतदाराच्या खात्यात रक्कम जमा करावी अन्यथा लोकशाहीचा मार्ग हातात घेण्याचा इशारा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page