⚡मालवण ता.१५-: नेहरू युवा केंद्र व युनिसेफ (क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार) आयोजित राज्यस्तरीय अभिरूप युवा संसद दि. १९ व २० नोव्हेंबर रोजी मुंबई येथील मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस, सांताक्रुज येथे संपन्न होणार आहे. या संसदेत ३६ जिल्ह्यातून ७२ युवा संसद प्रतिनिधी व गोव्यातील काही प्रतिनिधी सहभागी होणार असून यापैकी २४ प्रतिनिधी हे मंत्रिमंडळ कार्य पाहणार असून उर्वरित संसद सदस्य म्हणून कार्य पाहणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केशव नाचिवणेकर अभिरूप युवा संसदेत युवा खासदार म्हणून नेतृत्व करणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या संसदेत विधानभवन व राजभवनाच्या भेटीसह, युवा संसद युवकांच्या माध्यमातून चालवली जाणार आहे. यासाठी प्रा.नरेश शेटये व प्रा.शुभम निकम यांनी मार्गदर्शन केले. या अगोदर देखील अनेकदा केशव नाचिवणेकर याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उमटवले आहे. या राज्यस्तरीय संसदेत युवा खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल केशव नाचिवणेकर याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
