एरगनीचा छेर्रा लागून तळवडे येथील एक जखमी…

रविवारी सायंकाळची घटना: पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

⚡सावंतवाडी ता.१३-: एरगनीने फायर केलेला छेर्रा पाठीत लागून तळवडे म्हाळाईवाडी येथील मोहन भिवा मालवणकर (52) हे जखमी झाले. हा प्रकार रविवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी शेजारील अंकुश सिताराम लोके (24) याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक वृत्त असे की, रविवारी सायंकाळी मालवणकर हे घराकडे पायी चालत येत असताना अचानक त्यांच्या पाठीत काहीतरी आदळल्याचे जाणवले यावेळी ते मोठ्याने ओरडल्याने त्या ठिकाणी अंकुश लोके यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती धावत आले. अंकुश लोके यांच्या हातात यावेळी एरगन होती. त्यांनी मालवणकर यांना घरी घेऊन जात उजेडात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या पाठीत खालील भागास एरगनीचा छेर्रा लागल्याचे दिसून आले. आपण माकडांवर फायर केला छेर्रा झाडावर आदळून तुम्हाला लागला असावा असे यावेळी लोके यांनी सांगितले. यावेळी त्याना फारसा त्रास होत नसल्याने घरीच उपचार करुन ते झोपले. मात्र सकाळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना नातेवाईकांनी उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र छेर्रा आतमध्ये असल्याने त्यांना अधिक उपचाराकरिता गोवा बांबुळी येथे हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
दरम्यान येथील पोलिस ठाण्यात मालवणकर याचा मुलगा महेश मालवणकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार हयगईने व अविचाराने एरगनीचा छेर्रा फायर करुन दुसर्याच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अंकुश लोके याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

You cannot copy content of this page