राजकीय पक्षांनी आंदोलनस्थळी भेट घेत जाहीर पाठिंबा दर्शविला:सरकारने मराठा समाजाचा अधिक अंत न पाहता आरक्षणावर तत्काळ तोडगा काढावा…
⚡कुडाळ ता.०२-: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले मराठा नेते मनोज जरांगे- पाटलांच्या लढ्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी वेताळ बांबर्डे गावातील सकल मराठा समाजाने एकजूट दाखवत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास महामार्गावरील वेताळ बांबर्डे तेलीवाडी बस स्टॉपनजीक मराठा समाजातील महिला, पुरुष व शालेय विद्यार्थ्यांनी सनदशीर मार्गाने उपोषण आंदोलन सुरू केले आहे. यावेळी गावातील सर्व धर्मिय, जातीय आणि राजकीय पक्षांनी मराठा आंदोलकांची आंदोलनस्थळी भेट घेत आरक्षणास जाहीर पाठिंबा दर्शविला. दरम्यान कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. सरकारने मराठा समाजाचा अधिक अंत न पाहता आरक्षणावर तत्काळ तोडगा काढावा, आमच्या भावना वरिष्ठ शासन स्तरावर पोहचाव्यात अशी विनंती प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. अन्यथा, शांततेत आंदोलन करणारा मराठा समाज कसा पेटून उठतो याची वेळ राज्य सरकारने आणू नये असा इशारा मराठा समाज पदाधिकारी प्रसाद गावडे यांनी आंदोलनकर्त्यांच्या वतीने दिला. “जय भवानी जय शिवाजी, “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं”, “कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय”, एक मराठा लाख मराठा” अशा घोषणांनी मराठा आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी आनंद भोगले, शैलेश घाटकर, प्रदीप गावडे, आपा गावडे, सुशांत सावंत, देवळी समाजाचे साजुराम नाईक, तेली समाजाचे दिलीप तिवरेकर व दिनेश शिरवलकर, मुस्लिम समाजाचे बाबा मुजावर, सलीम शेख, चंद्रकांत गावडे, नारायण गावडे, दिलीप सावंत, स्नेहा दळवी, सरपंच वेदिका दळवी, रमण गावडे, संदीप सावंत, बबन कदम, आबा घाडी यांच्यासह असंख्य मराठा बांधवांनी उपोषणात सहभाग घेतला. मुख्य म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गाव पातळीवरील हे पहिलेच मराठा बांधवांचे उपोषण होय.
आमदार वैभव नाईक यांनी दिली उपोषणस्थळी भेट
मराठा बांधवांच्या उपोषण स्थळी आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, सिंधुदुर्गातील गाव पातळीवर मराठा उपोषण होणारे वेताळ बांबर्डे हे पहिलेच गाव आहे. या गाव पातळीवरील उपोषणाची झळ राज्य सरकारला नक्कीच बसेल आणि मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळेल. सरकारने मराठा आरक्षण प्रश्र्नी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली. आपण लोकप्रतिनिधी म्हणून मराठा बांधवांच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
