*💫मालवण दि.११-:* कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने संपादित केलेले ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे सिंधुदुर्गातील प्रतिभावान साहित्यिकांच्या साहित्यविषयक कार्याचा आढावा घेणारे पुस्तक नुकतेच सत्वश्री प्रकाशन रत्नागिरी यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रतिभावंत साहित्यिकांची ओळख करुन देण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदुर्गातील जे साहित्यिक सुप्रसिद्ध असूनही जनसामान्यांपर्यंत पोहचू शकले नाहीत, अशा वीस निवडक साहित्यिकांना स्थान देण्यात आले आहे. यात साहित्यिक आ.सो.शेवरे, वसंत आपटे, प्रतिभा आचरेकर, पा. ना.मिसाळ, ल.मो.बांदेकर, डॉ. विद्याधर करंदिकर, आ.द. राणे, जी. टी. गावकर, विद्याधर भागवत, विजय चिंदरकर, आ. ना. पेडणेकर, श्रीपाद काळे, बाळकृष्ण प्रभुदेसाई, वसंत सावंत, परशुराम देसाई, लुई फर्नांडिस, हरिहर आठलेकर, वसंतराव म्हापणकर, जनयुगकार खांडाळेकर, महामहोपाध्याय वा. वि. मिराशी आदी साहित्यिकांवर लेख लिहिले आहेत. या पुस्तकातील लेख सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी लिहिले आहेत. जिल्हा परिषद शिक्षण समिती सभेत या पुस्तकावर चर्चा करण्यात आली. सदरच्या पुस्तकातून जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थांच्या ज्ञानात भर पडून त्यांना साहित्यविषयी गोडी लागण्यास मदत होऊ शकते. तसेच ख-या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख विद्यार्थांना होणार आहे. या दृष्टीने शिक्षण समिती, जिल्हा परिषद सिंधुदुर्गने विशेष ठरावाद्वारे प्रत्येक शाळेने आपल्या शालेय वाचनालयासाठी समग्र शिक्षा अनुदान अथवा सादील अनुदान यांतून ऐच्छिक स्वरुपात खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. ‘सिंधुसाहित्यसरिता’ पुस्तक खरेदीस मान्यता दिल्याबद्दल शिक्षण सभापती सौ. सावी लोके, शिक्षण समिती सचिव तथा शिक्षणाधिकारी श्री. एकनाथ आंबोकर तसेच सर्व सदस्य- शिक्षण समिती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने या पुस्तकाचे संपादक तथा कोमसाप मालवण अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर यांनी विशेष आभार मानले.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण संपादीत ‘सिंधुसाहित्यसरिता’ पुस्तक खरेदीस प्राथमिक शाळांना मान्यता….
