तहसीलदार पथक घटनास्थळी पोहोचत पाच होड्याना दिली जलसमाधी…
मालवण दि प्रतिनिधी
मालवण तालुक्यात कर्ली आणि कालावल खाडीपात्रात वाळूमाफिया कडून राजरोसपणे बेकायदेशीर रित्या वाळू उपसा केला जात असताना महसूलबरोबरच संबंधित प्रशासनाकडून म्हणावी तशी कारवाई होत नसल्याने खाडी पट्ट्यामध्ये प्रशासना विरोधात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे काल रविवारी कालावल खाडीतील तेरई भागात दहा ते बारा होड्यांद्वारे वाळू माफियाकडून बेकायदेशीर वाळू उत्खनन होत असल्याचे दिसताच तळाशीलच्या महिलांनी या वाळू उत्खननाच्या ठिकाणी धडक देत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर याच दरम्यान त्याठिकाणी आलेल्या मालवणच्या तहसीलदारानी कालावल खाडीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी उभ्या असणाऱ्या पाच होड्यांना जलसमाधी दिल्याने बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत
यासंबंधीचे अधिक वृत्त असे की, मालवण तालुक्यात कालावल खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या वाळू उत्खनन होत असून या वाळू उत्खननामुळे तोंडवळी तळाशील गावाची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. याबाबत तोंडवळी तळाशीलच्या ग्रामस्थांनी शासनाचे अनेकवेळा दरवाजे ठोठावले अर्ज, निवेदने दिली मात्र शासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात वाळू माफियांच्या विरोधात कारवाई केली जाते असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या पार्शवभूमीवर गेल्या काही दिवसात कालावल खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन होत असल्याने व अद्याप वाळू लिलाव प्रक्रिया झाली नसतानाही बेकायदेशीर रित्या वाळू माफी्यांकडून वाळूचा उपसा केला जात आहे. विशेषतः शासकीय सुट्टीत कालावल खाडीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन होते. काल रविवारी कालावली खाडीपात्रातील तेरई भागात दहा ते बारा होड्यां मधून वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याचे तळाशीलच्या महिलांच्या निदर्शनास येताच महिलांनी त्याठिकाणी धाव घेत वाळू उपसा करणाऱ्या कामगारांना मज्जाव केला. मात्र, महिलांनी केलेल्या विरोधात वाळू उपसा करणारे जुमानत नसल्याचे दिसताच महिलांनी तहसीलदारांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला. यावेळी मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे, निवासी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हेमंत पेडणेकर, सुशांत पवार यांच्यासह तलाठी डी. सी. ठाकूर, व्ही. एम. राठोड, बंदर विभागाचे कर्मचारी साहेबराव कदम, मंडळ अधिकारी श्रीमती एम. एस. चव्हाण, आर. एस. शेजवळ यांच्या यांच्या संयुक्त पथकाने तेरई तसेच हडी भागात धाव घेतली व वाळू उपसा करण्यासाठी उभ्या असलेल्या दिसल्या यात पाच अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या नौका आढळून आल्या. या नौकांवर वाळू आढळून आली. मात्र कोणत्याही व्यक्ती दिसून आल्या नाही. यातील काही नौका या लोखंडाच्या तर काही लाकडी होत्या. या पाचही नौका खाडीपात्रात बुडवून नष्ट करण्याची कार्यवाही पथकाकडून करण्यात आली. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे तहसीलदार वर्षा झालटे यांनी स्पष्ट केले. एकूणच या प्रकाराने बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
