पारंपरिक मच्छीमारांची मत्स्य विभागात धडक…

तळाशील समुद्रातील वादाची किनार:पर्ससीन बोटींवर कारवाई करण्यास पाडले भाग..

मालवण (प्रतिनिधी)

तळाशीलच्या समुद्रात पर्ससीन मच्छिमार व परंपारीक मच्छीमार यांच्यात घडलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज पारंपारिक मच्छिमारांनी मालवण येथील मत्स्य व्यवसाय विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. मच्छिमारांनी पर्ससीन नौकांवर कारवाई करण्यासाठी कार्यालयातच ठिय्या मांडत मत्स्य विभागाला पर्ससीनवर कारवाई करण्यास भाग पाडले. त्यानुसार मालवण बंदरात करण्यात आलेल्या कारवाईच्या वेळी अधिकाऱ्यांच्याच डोळ्यासमोर दोन पर्ससीन नौकांनी पळ काढल्याने पारंपारिक मच्छिमारांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर अन्य दोन पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई केली.

तळाशीलच्या समुद्रात पर्ससीन नौकांवर पारंपारिक मच्छिमारांनी हल्ला केल्याने पारंपारिक विरुद्ध पर्ससीन मच्छिमार हा संघर्षाला पुन्हा एकदा तोंड फुटल्याने या पार्श्वभूमीवर आज मालवण दांडी येथे पारंपारिक मच्छिमारांची आयोजित केलेल्या बैठकीत अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाई करण्यास अकार्यक्षम ठरलेल्या मत्स्य विभागाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या बैठकीनंतर मच्छिमारांनी मालवणातील मत्स्य विभागाच्या कार्यालयावर धडक देत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. अलगिरी यांना अनधिकृत पर्ससीन विरोधात कारवाई होत नसल्याबाबत जाब विचारला. यावेळी मच्छिमार नेते दिलीप घारे, मिथुन मालंडकर, रविकिरण तोरसकर, बाबी जोगी, सन्मेष परब, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, संजय केळूसकर, भाऊ मोर्जे यांसह मोठ्या संख्येने पारंपारिक मच्छिमार उपस्थित होते.

अनधिकृत पर्ससीन मासेमारीवर कारवाई बाबत मत्स्य अधिकारी डोळेझाक करत आहेत, आमच्या संघर्षाला मत्स्य विभाग जबाबदार आहे, असा आरोप यावेळी मच्छिमारांनी केला. जिल्ह्यात परवाना नसलेल्या अनेक पर्ससीन नौका समुद्रात मासेमारी करत आहेत. त्यावर मत्स्य विभाग कारवाई का करत नाही ? समुद्रात मासेमारी करणाऱ्या अनधिकृत पर्ससीन नौका मत्स्य अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का? असे सवाल मच्छिमारांनी केले. आजचा कार्यालयीन वेळ संपेपर्यंत मालवणच्या समुद्रात असलेल्या पर्ससीन नौकांवर कारवाई झालीच पाहिजे, त्यासाठी पोलीस बंदोबस्तही मागावा, अशी मागणी मच्छिमारांनी करत कार्यालयातच ठिय्या मांडला. मच्छिमारांनी आक्रमक पवित्रा घेत श्री. अलगिरी यांना कारवाईसाठी भाग पाडले.

यानंतर सर्व मच्छिमारांसह मत्स्य अधिकारी व पोलीस मालवण बंदर जेटी येथे दाखल झाले. यावेळी कारवाई साठी पोलिसांची गस्ती नौका घेण्यात आली. यावेळी मत्स्य अधिकारी व पोलीस हे छोट्या नौकेतून पोलिसांच्या गस्तीनौकेकडे पोहचेपर्यंत मच्छिमारांनी मालवण बंदरातील दाखविलेल्या दोन पर्ससीन नौकांनी समुद्रातून पळ काढला. मत्स्य अधिकारी व पोलीसांच्या डोळ्यादेखत पर्ससीन नौका पळून गेल्याने उपस्थित पारंपारिक मच्छिमारांनी तीव्र संताप व्यक्त केला.

यानंतर कारवाई साठी गेलेल्या मत्स्य अधिकारी व पोलीस यांच्या पथकाने मालवण बंदरात उभ्या करून ठेवलेल्या गणपत पुंडलिक परब यांच्या मक्रेश्वर प्रसाद या पर्ससीन नौकेवर कारवाई केली. तर अन्य एक पर्ससीन नौका पळून जातं असताना मच्छिमारांच्या खबरदारीमुळे मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेने ती पकडली. सदर साईप्रसाद नामक नौका ही गीता बापर्डेकर यांच्या मालकीची असून त्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिली. ही कारवाई सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. अलगिरी, परवाना अधिकारी मुरारी भालेकर, मत्स्य अधिकारी तेजस्विता करंगुटकर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस सुभाष शिवगण, सागरी सुरक्षा रक्षक सागर परब, गीतेश मायबा यांच्या पथकाने केली.

You cannot copy content of this page