कोमसाप मालवण शाखेच्या ‘ये ग, ये ग सरी’ काव्यसंग्रहाचे ७ रोजी प्रकाशन

⚡मालवण ता.२९-: कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण शाखेतील २५ कवींच्या कवितांचा समावेश असलेला ये ग,ये ग सरी या कवितासंग्रहाचे प्रकाशन कविकुलगुरू केशवसुत यांच्या पुण्यतिथी दिवशी दि. ७ नोव्हेंबर रोजी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे दुपारी ३:३० वाजता होणार आहे.

ये ग, ये ग सरी या कवितासंग्रहातील कविता कोमसाप मालवणच्या २२ उदयोन्मुख कवींनी लिहिल्या असून त्यात रुजारिओ पिंटो, सुनंदा कांबळे, एकनाथ गायकवाड या तिघा प्रतिथयश कवींच्या कवितांचाही समावेश आहे. प्रत्येक कवीच्या प्रत्येकी सहा कविता या कवितसंग्रहात असून एकूण १५० कवितांचा संग्रह आहे. हा कवितासंग्रह सत्त्वश्री प्रकाशन, रत्नागिरी यांनी प्रकाशित केला असून कवितासंग्रहाचे संपादन कोमसापचे मालवण अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी केले आहे. श्री. माधवराव गावकर यांची या कवितासंग्रहाला प्रस्तावना लाभली आहे.

हा प्रकाशन सोहळा कोमसाप सिंधुदुर्गचे अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली आणि नमिता कीर, (केंद्रीय अध्यक्ष कोमसाप), अनिकेत कोनकर (प्रकाशक, सत्त्वश्री प्रकाशन), माधवराव गावकर, सुरेश ठाकूर (संपादक) यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी “सर आली धावून” हा काव्यवाचन कार्यक्रम होणार आहे. तरी या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा मालवण यांच्यावतीने निमंत्रक गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page